scorecardresearch

साबुदाणा स्वस्त; शेंगदाणा, राजगिरा स्थिर; नवरात्रीमुळे मागणी वाढली

नवरात्रीच्या उपवासांमुळे साबुदाणा, वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मागणी वाढूनही किरकोळ बाजारात साबुदाणा तीन ते चार रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याचे दर स्थिर आहेत.

साबुदाणा स्वस्त; शेंगदाणा, राजगिरा स्थिर; नवरात्रीमुळे मागणी वाढली
साबुदाणा चार रुपयांनी स्वस्त

पुणे  : नवरात्रीच्या उपवासांमुळे साबुदाणा, वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मागणी वाढूनही किरकोळ बाजारात साबुदाणा तीन ते चार रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याचे दर स्थिर आहेत. पौष्टिक तृणधान्य म्हणून वरई खाण्यास लोक पसंती देत असल्यामुळे वरईच्या दरातील तेजी टिकून आहे.    

  देशात तामिळनाडूमधील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणाचे उत्पादन घेतले जाते. येथे तयार होणारा साबुदाणा संपूर्ण देशात विक्री होतो. यंदा स्थानिक उत्पादकांनी अचानकपणे साबुदाण्याचे भाव वाढविले होते. मात्र, भाववाढीनंतर मागणी घटली होती, त्याचा परिणाम म्हणून भाव कमी करण्यात आले. मागील पंधरा दिवसांत किलोच्या भावात तब्बल पंधरा रुपयांनी घसरण झाली आहे. पुणे बाजार समितीत सध्या दररोज सरासरी १०० टन साबुदाण्याची आवक होत असल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. नवीन शेंगदाण्याची कर्नाटक आणि गुजराथ येथून आवक सुरू झाली आहे. मात्र, ती अतिशय कमी आहे. येत्या पंधरावडय़ात आवक वाढेल. त्यामुळे नवरात्रीनंतर भावात घट होण्याची शक्यता आहे. सध्या वाढलेल्या भावानेच ग्राहकांना शेंगदाणे खरेदी करावे लागणार आहेत.

तृणधान्यांबाबत जागृतीमुळे वरईला मागणी

शहरी ग्राहकांमधून पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न म्हणून तृणधान्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे उपवासाचे दिवस वगळूनही वर्षभर वरईला मागणी असते. यंदा लहरी हवामानामुळे वरईच्या उत्पादनात घट झाली आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून भगरीच्या कच्च्या मालाची आवक होते. तेथून नाशिक जिल्ह्यात प्रक्रिया होऊन वरई बाजारात दाखल होत असतो. पुण्यात रोज सुमारे शंभर टन वरईची आवक होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वरईच्या भावात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापारी आशिष दुग्गड यांनी दिली.

किरकोळ बाजारातील दर

(प्रति किलो, रुपयात)

  • साबुदाणा : ७० ते ८४
  • शेंगदाणा : १२२ ते १२६
  •   राजगिरा : ११८
  •   वरई : ११० ते ११८

नवरात्रीच्या उपवासामुळे साबुदाणा, वरई, राजगिरा आणि शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. साबुदाण्याच्या भावात मागील काही दिवसांत घटीचा कल आहे. वरईच्या भावातील तेजी कायम आहे.

आशिष दुग्गड, व्यापारी मार्केट यार्ड.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या