साहित्य संमेलन म्हणजे ‘रिकाम टेकडय़ांचा उद्योग’ असे हिणवणारे ज्ञानपीठ साहित्य पुरस्कार विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे िपपरीतील नियोजित साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत, असे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी निगडीत एका कार्यक्रमात नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाद सबनीस यांच्या साक्षीने जाहीर केले. तेव्हा असे झाल्यास राज्याचा सांस्कृतिक इतिहास बदलेल. रिकामटेकडी माणसेही कामाची असतात, हे नेमाडे यांच्या उपस्थितीने अधोरेखित होईल, आपण त्यांच्यासाठी पायघडय़ा घालू, अशा सूचक शब्दात सबनीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या िपपरी शाखेसह सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील २२ संस्थांनी मिळून सबनीस व डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्राधिकरणातील तारांगण सभागृहातील या कार्यक्रमात सुरुवातीला डॉ. पी. डी. पाटील यांनी संमेलनासाठी नेमाडे यांना निमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारल्याचे सांगितले. तो धागा पकडून सबनीस यांनी, ही सर्वात धक्कादायक गोष्ट आपल्याला डॉ. पाटील यांच्या भाषणातून समजल्याचे नमूद केले. ते म्हणाले, डॉ. नेमाडे यांची संमेलनात मुलाखत घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. माझ्यासारखा रिकामटेकडा माणूस संमेलनाचा अध्यक्ष असताना, नेमाडे यांच्यासारखा अत्यंत कामाचा माणूस आणि ज्ञानपीठ विजेता साहित्यिक संमेलनात सहभागी होणार असेल तर मी त्यांचे त्रिवार अभिनंदन करतो. ते आले तर मी स्वत: पायघडय़ा घालून स्वागत करायला तयार आहे. नेमाडे संमेलनात आले तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास नव्याने लिहिला जाईल. रिकामटेकडी माणसे कामाची असतात, हे नेमाडे यांच्या उपस्थितीत अधोरेखित होईल, असे ते म्हणाले.
मी कोणाच्याही खिशात नाही
संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी घरी येऊन शेतकऱ्याचा पोषाख देऊन सत्कार केला, तो योग्य सत्कार वाटतो, असे सांगत श्रीपाद सबनीस म्हणाले, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. भविष्यातही राजकीय पक्षात जाणार नाही. कोणाच्या खिशात जाऊन बसणार नाही आणि अकारण कोणाला विरोध करणारही नाही. दु:खमुक्त मानवतेसाठी आपण सारे कटिबध्द आहोत.