पुणे : शेतमालाला केवळ हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत १२४५ ठिकाणी शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीव्यवस्था उभी केली आहे.

हे अभियान गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरू करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आतापर्यंत १३५२ ठिकाणे निश्चित करून १२४५ ठिकाणी प्रत्यक्ष विक्री सुरू आहे. शेतमाल विक्रीची सुविधा झाल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यासोबतच ग्राहकांनादेखील चांगल्या प्रतीची उत्पादने मिळत आहेत. या व्यवस्थेने शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा झाला आहे. या अभियानामुळे ताज्या भाजीपाल्यासह धान्य व कडधान्ये ग्राहकाला आपल्या परिसरात उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी तसेच शेतकरी गट यांना किमान १०० ठिकाणी शेतमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण २५० शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी यांना ठोक खरेदीदार, प्रक्रियादार तसेच निर्यातदारांना शेतमाल मूल्यसाखळी अंतर्गत जोडण्यात येत आहे. जिल्ह्यात उत्पादित पिकासाठी एकूण ५२ मूल्यसाखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत असून शेतमाल विक्रीसाठी नाममुद्रा (ब्रॅण्ड) विकसित करण्यात येत आहेत. वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाची ‘राजतोरण’ हा ब्रॅण्ड बनवला आहे. चालू वर्षी करोनाकाळात तब्बल २२ टनाहून अधिक तांदळाची विक्री केली आहे. वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांनी करोना कालावधीत ‘राजगड’ या ब्रॅण्डच्या ३५ ते ४० टन तांदळाची थेट विक्री केली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुळशी तालुक्यातील ‘महासत्व’ ब्रॅण्ड विकसित केला असून त्यामध्ये शेतकरी ते ग्राहक तांदूळ व नाचणी थेट विक्री करोना कालावधीमध्ये करण्यात आली आहे, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

थेट विक्रीसाठी आठवडी बाजार

पुणे महानगरपालिका क्षेत्रात २३ जागा उपलब्ध होऊ शकणार आहेत. महाअ‍ॅग्री एफ.पी.ओ. फेडरेशन यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सहा जागांची आठवडी बाजार सुरू करण्यासाठी निवड केलेली असून ४१ शेतकरी उत्पादक कंपन्या त्यासाठी इच्छुक आहेत. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी चार ठिकाणी ३६० शेतकरी गट आणि १८ शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत आठवडी बाजार सुरू करण्यास इच्छूक आहे. आजरा घनसाळ शेतकरी उत्पादक कंपनी चार जागी ३७ शेतकरी गटांमार्फत आठवडी बाजार सुरू करण्यास इच्छुक आहे.