दीड हजार किलो पनीर जप्त; मित्रमंडळ चौकातील विक्रेत्यावर छापा

पुणे : भेसळयुक्त पनीरची विक्री करणाऱ्या एका दुकानावर गुन्हे शाखेने छापा टाकला. मित्रमंडळ चौकात असलेल्या या घाऊक दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावरील कारवाईत दीड हजार किलो पनीर जप्त करण्यात आले.

मित्रमंडळ चौकातील विष्णू सोसायटीच्या तळमजल्यावर हरिकृष्ण मुरलीधर शेट्टी यांचा दुग्धजन्य पदार्थाची विक्री   करण्याचा व्यवसाय आहे. तेथून शेट्टी किरकोळ विक्रेत्यांना पनीर वितरित करतात. शेट्टी यांच्या दुकानातून भेसळयुक्त पनीरची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस हवालदार गणेश साळुंके यांना मिळाली. त्यानंतर या प्रकाराची माहिती अन्न आणि औषध प्रशासन तसेच अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांना देण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील निरीक्षक कुलकर्णी आणि काकडे यांच्या सहकार्याने पोलिसांनी तेथे छापा टाकला. शेट्टी यांच्या दुकानाला कोणतेही नाव नसल्याचे निदर्शनास आले. पनीर विक्रीसाठी लागणारा अन्न आणि औषध विभागाचा परवानादेखील त्यांच्याकडे नव्हता. शेट्टी त्यांच्या दुकानातून १४०१ किलो पनीर जप्त करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून तपासणीसाठी पनीरचे काही नमुने ताब्यात घेण्यात आले. उर्वरित पनीर शीतगृहात ठेवून ते लाखबंद करण्यात आले. सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक निरीक्षक गणेश पवार, गणेश साळुंके, सुनील पवार, नीलेश शिवतारे, राकेश खुणवे यांनी ही कारवाई केली.

भेसळयुक्त पनीर पालघरमधून

शहरातील  हॉटेल व्यावसायिकांकडून पनीरला मोठी मागणी असते, तसेच विवाह समारंभातील खाद्यपदार्थामध्ये पनीरचा वापर केला जातो. मित्रमंडळ चौकातील शेट्टी यांच्या दुकानात छापा टाकून मोठय़ा प्रमाणावर भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आल्यामुळे शहरात सर्रास भेसळयुक्त पनीरची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. शेट्टी यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत भेसळयुक्त पनीर पालघरमधील वाडा तालुक्यातून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तसेच कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.