दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात काही शे कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या फटाके व्यवसायाला आताच्या दिवाळीत मंदी, वाढलेली महागाई आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचा मोठा फटका बसला आहे. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांना आधीच घसरण लागलेली असताना आता रोषणाईच्या फटाक्यांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात या व्यवसायाला आणखी घरघर लागणार का, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. त्यातही मोठय़ा शहरांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, या दिवाळीत वेगवेगळय़ा कारणांमुळे फटाक्यांचा बार ‘फुसका’ निघाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी त्यांची विक्री तब्बल २५ ते ५० टक्क्य़ांनी घटली आहे. २०११ च्या तुलनेत तर या वेळी खूपच कमी फटाके विकले गेले. हा कल गेले तीन वर्षे कायम असल्याने ती या व्यवसायासाठी धोक्याची घंटा असल्याची भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत. आताच्या वर्षी बहुतांश व्यावसायिकांकडील फटाके मोठय़ा प्रमाणात शिल्लक राहिले असल्याचे निरीक्षण पुणे व मुंबईतील व्यापाऱ्यांनी सांगितले. हीच स्थिती नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमध्येही होती.
या वेळच्या दिवाळीवर मंदीचे सावट होते. फटाक्यांच्या किमतीत २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढ झाली. त्याचबरोबर शाळांमध्ये फटाके न वाजवण्याबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे अनेक शहरांमध्ये मुलेच फटाके वाजवण्याबाबत पालकांना सांगत होती, असे निरीक्षण सर्वच शहरांतील फटाके विक्रेत्यांनी नोंदवले. फटाक्यांची विक्री घटल्यामुळे या वेळी लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता दिवाळीच्या इतर दिवशी फटाक्यांचा धूर निघाला नाही. त्यामुळे काही प्रमाणात मोकळा श्वास घेणे शक्य झाले.
फटाके कमी वाजण्याची कारणे-
१. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे मुलांचा कल
२. फटाके न वाजवण्याबाबत शाळांमधून जागरूकता, मुलांनी घेतलेल्या शपथा
३. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा फटका
४. विविध कारणांमुळे फटाक्यांच्या किमतीत २५-३० टक्के वाढ
५. काही शहरांमध्ये रस्त्यांवर स्टॉलला परवानगी नाकारल्याने स्टॉल्सची संख्या कमी                  

पुण्यात ‘फुसका’ फटाका
पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरात फटाक्यांची विक्री लक्षणीय कमी झाल्याचा सर्वच फटाका विक्रेत्यांचा अनुभव आहे. म्हात्रे पुलाजवळ फटाक्यांची विक्री करणारे प्रशांत दिवेकर यांनी सांगितले की, यंदा फटाका स्टॉलवर ग्राहकांची गर्दी दिसलीच नाही. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६०-७० टक्के इतकीच विक्री झाली. त्यामुळे सर्वच विक्रेत्यांकडे मोठय़ा प्रमाणात फटाके शिल्लक राहिले. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपापर्यंत सर्व फटाक्यांची विक्री व्हायची. अगदीच नाममात्र प्रमाणात फटाके शिल्लक असायचे. या वेळी मात्र म्हात्रे पुलावर सर्वच व्यापाऱ्यांचा निम्म्याहून अधिक माल शिल्लक राहिला.
या व्यवसायात ५० वर्षांपासून असलेले ज्येष्ठ व्यापारी संजय शिरसाळकर यांनी सांगितले की, पुण्यात फटाक्यांच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. २०११ साली दिवाळीत फटाक्यांची जेवढी विक्री झाली, त्या तुलनेत केवळ ६५ टक्के विक्री २०१२ साली म्हणजे गेल्या वर्षी झाली. यंदाही त्याहीपेक्षा कितीतरी कमी विक्री झाली. २०११ सालाशी तुलना केली तर या वर्षी केवळ २५ ते ३० टक्के इतकीच फटाक्यांची विक्री झाली. पुण्याच्या काही भागात २०११ साली दिवाळीच्या काळात साधारण आठ ते दहा कोटी रुपयांचे फटाके विकले गेले होते. या वर्षी किमती २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढूनही यंदा विक्रीचा आकडा खूपच खाली आला, असेही शिरसाळकर यांनी सांगितले.
पुण्यात या दिवाळीत खूपच कमी फटाके वाजले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजले, पण त्याचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत कमी होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि पाडव्याच्या दिवशी तर खूपच कमी प्रमाणात फटाके वाजले. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात मोकळा श्वास घेणे शक्य झाले. पुण्यात मंदी व फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याने विक्रीवर परिणाम झाला. त्याचबरोबर पुणे महापालिकेने रस्त्यावर स्टॉल लावण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे स्टॉल्सची संख्या कमी होती. दिवाळी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरी करण्याबाबत अनेक शाळा आणि विविध संघटनांच्या माध्यमातून जागरुकता करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मुलांनी फटाके न वाजवण्याची शपथ लिहून दिली होती. त्याचाही विक्रीवर परिणाम झाला.
मुंबईत महागाई-जनजागृतीचा ‘फटाका’
महागाई, पोलीस-स्वसंसेवी संघटनांचीध्वनिप्रदूषणाविरोधात मोहीम याचा यंदा मुंबई व ठाणे परिसरात प्रामुख्याने आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीला फटका बसला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संपूर्ण मुंबईसह ठाण्यातील फटाक्यांच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली.
महागाई व लोकांमधील प्रदूषणाबाबत जागृतीचा यंदा पहिल्यांदाच फटाक्यांच्या खरेदीवर मोठय़ा प्रमाणावर परिणाम झाल्याचे मुंबई आणि ठाणे जिल्हा फटाके विक्रेता कल्याण संघटनेचे सरचिटणीस मिनेश मेहता यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या पाश्र्वभूमीवर यंदा मुंबई पोलिसांच्या संपर्क विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘आवाज फाऊंडेशन’ च्या सुमैरा अब्दुल अली तसेच फटाके विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिवाळीपूर्वी बैठक बोलावली होती. दिवाळीपूर्वीच ध्वनिप्रदूषणाविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली होती. माध्यमांनीही त्याला तेवढीच प्रसिद्धी दिली. महागाईचे कारणही होते. परिणामी फटाक्यांची, त्यातही आवाजाच्या फटाक्यांची खरेदी कमी झाली, असे मेहता यांनी सांगितले.
यंदा लोकांकडूनच कमी आवाज करणारे फटाके आहेत का, याबाबत प्रामुख्याने विचारणा करण्यात येत होती. आवाज न करणाऱ्या फटाक्यांची मागणी असल्याने यंदा पहिल्यांदाच खरेदीवर २५ ते ३० टक्के परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले.
विदर्भात विक्री अर्ध्यावर
वाढती महागाई, अतिवृष्टी आणि पर्यावरणाविषयी निर्माण झालेली जागरुकता यामुळे गतवर्षीच्या तुलनेत विदर्भात यंदा फटाक्यांच्या विक्रीत ५० टक्के घट झाली. ध्वनिप्रदूषणाची पातळीही यंदा नियंत्रणात राहिली.
शहरातील पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करणाऱ्या विविध संघटनांनी यावर्षी ‘ग्रीन दिवाळी’ ही संकल्पना राबवली. यामुळे विशेषत: शाळकरी मुलांमध्ये फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण झाली. महागाई शिगेला पोहोचल्याने त्याचाही परिणाम फटाके विक्रीवर झाला. फटाक्यांच्या किमतीत झालेली वाढदेखील यासाठी कारणीभूत ठरली. प्राप्त होणाऱ्या मिळकतीतून घरखर्च करावा की फटाके विकत घ्यावे, असा प्रश्न मध्यमवर्गीयांमध्ये होता. त्यामुळे यंदा मध्यमवर्गीयांनी फटाके खरेदीला कात्री लावली. गेल्यावर्षी नागपूरच्या ठोक बाजारात ६० कोटींची फटाके विक्री झाली होती. यावर्षी ती तब्बल अध्र्याने घटून ३० कोटींवर आली, अशी माहिती नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी दिली.
फटाके विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ. रवींद्र भुसारी म्हणाले, फटाक्यांपासून मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत यावर्षी समाजात जनजागृती करण्यात आली. त्याचे परिणाम चांगले दिसून आले. फटाक्यांवरील खर्च हा अनाठायी आहे, असे आता नागरिकांना समजू लागले आहे. दरवर्षी हजार रुपयांचे फटाके खरेदी करणाऱ्यांनी यावर्षी पाचशे रुपयांचे फटाके विकत घेतले. काहींनी फटाक्यांवर होणारा खर्च अन्य चांगल्या कार्यात खर्च केला. यामध्ये शहर पोलिसांचे तसेच पर्यावरणवाद्यांचे सहकार्य लाभले. या सर्वाचा संयुक्तिक परिणाम म्हणून यावर्षी नागरिकांनी फटाक्यांना पाठ दाखवली. गेल्या अनेक वर्षांपासून फटाकाविरोधी अभियान राबवले जात असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत, असे भुसारी यांनी सांगितले.
नाशिकमध्येही विक्रीवर परिणाम
फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल प्रभावीपणे झालेली जनजागृती, सुटींमुळे पर्यटनाला जाण्याकडे असणारा ओढा आणि दरवाढ यांच्या एकत्रित परिणामांमुळे नेहमीच्या तुलनेत यंदा नाशिकमध्ये फटाके विक्रीत काही प्रमाणात घट झाली. त्यातही ‘आवाजी’ पेक्षा ‘फॅन्सी’ फटाक्यांना ग्राहकांची पसंती मिळाली.
नाशिक शहरात दरवर्षी फटाके खरेदी-विक्रीच्या व्यवसायात कोटय़वधींची उलाढाल होत असते. यंदा उलाढालीचा आकडा काहीअंशी कमी झाल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले. परंतु नाशिक फटाका संघटनेचे जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्थिती बरी राहिल्याचा दावा केला.
ग्राहकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने बराचसा माल शिल्लक राहिला. त्यात पारंपरिक आवाजी फटाक्यांचा अधिक समावेश असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ध्वनी व वायुप्रदूषणाला हातभार लावणारी दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी व्हावी याकरिता अंधश्रध्दा निर्मूलन समितीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेतला होता. त्यात अनेक शाळा सहभागी झाल्या. दिवाळीनंतर बहुतेक कुटुंब भ्रमंतीसाठी बाहेर पडत असल्याने फटाके उडविण्याचा कालावधीही कमी होत आहे. या वर्षी दिवाळीतील दोनच दिवस प्रामुख्याने फटाके उडविले गेले. त्यामुळे दोन ते तीन दिवस पुरतील इतकेच फटाके खरेदी करण्याचा कल राहिला, असे जातेगावकर यांनी सांगितले. नाशिकमध्ये फटाक्यांच्या किमतीत यंदा जवळपास १० टक्के वाढ झाली होती.
औरंगाबादेत फटाके ‘फुटले’च नाहीत
औरंगाबादमध्ये दिवाळी साजरी झाली, पण फटाके तसे फुटलेच नाहीत. काय कारण असावे, याचे कोडे फटाका विक्रेत्यांनाही सुटता सुटेना, अशी अवस्था आहे. शिवकाशी येथून आणलेले फटाके पडून राहिल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. फटाका विक्रीत ३५ ते ४० टक्के घट झाली. महागाई, मंदी यामुळे पसा वेळवर हातात न आल्याने फटाक्यांची विक्री कमी झाली असावी, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शहरात जिल्हा परिषदेच्या मदानात फटाक्यांची दुकाने लागतात. या वर्षी तुलनेने अधिक दुकाने उभारण्यात आली. मात्र, दिवाळीपूर्वी फटाके खरेदीसाठी तशी गर्दी झालीच नाही. फटाका विक्रेते राजेंद्र पारगावकर यांनी सांगितले की, तसे कारण फटाका व्यापाऱ्यांनाही कळाले नाही. मात्र, मंदीचा परिणाम असू शकतो. प्रदूषण होत असल्याच्या मानसिकतेमुळे फटाके खरेदी झाली नाही. या म्हणण्यात फारसे तथ्य नसल्याचे ते म्हणाले. बाजारपेठेतल्या अर्थकारणात काही तरी चूक आहे. त्यामुळे फटाके विक्री झाली नाही. मुख्य कारण महागाईच असावे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष