scorecardresearch

अरबी समुद्रात स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नये; संभाजी भिडे गुरुजी यांची टिप्पणी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या श्री  क्षेत्र भीमाशंकर ते शिवनेरी जुन्नर धारातीर्थ  गडकोट मोहिमेची सांगता जुन्नर येथे झाली.

sambhaji bhide
अरबी समुद्रात स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नये;संभाजी भिडे गुरुजी यांची टिप्पणी

नारायणगाव : सरकारे उलथी पालथी होतात. तो त्यांचा धंदा आहे. सगळे देखावेच  आहेत. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात करण्याचा बेशरमपणा करू नये,  अशी टिप्पणी करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी नियोजित स्मारकास विरोध दर्शविला. शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी न करता हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तिथीनुसार साजरी करावी, असे आवाहन भिडे यांनी या वेळी केले.

हेही वाचा >>>जगताप कुटुंबीयांच्या उमेदवाराचा विजय हीच खरी दिवंगत लक्ष्मण जगतापांना श्रद्धांजली!

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या श्री  क्षेत्र भीमाशंकर ते शिवनेरी जुन्नर धारातीर्थ  गडकोट मोहिमेची सांगता जुन्नर येथे झाली. त्याप्रसंगी भिडे गुरुजी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश लांडगे, उद्योजक संजय मालपाणी, भावेश भाटिया, धनंजय देसाई, निलकंठेश्वर स्वामी,  माजी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके, मधुकर काजळे यांच्यासह हजारो भगवे फेटेधारी युवक, हातामध्ये तलवारी, भाले घुंगुरकाठी घेऊन धारकरी, शिवप्रेमी युवक, आणि नागरिक या वेळी उपस्थित होते.

भिडे म्हणाले की , हिंदुस्तानचा जन्म धर्म संस्थापनेसाठी झाला आहे. हिंदवी स्वराज्य हा जीवनाचा मार्ग आहे हे शहाजी महाराजांनी दाखविले आणि छत्रपती शिवरायांनी तो मार्ग अनुसरला. वल्गना न करता राष्ट्रबांधणी करण्याचा मार्ग शिवरायांनी दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे महामृत्युंजय आणि संजीवनी मंत्र आहेत. ते समाजात भिनून एकरूप होणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ आणि  छत्रपती शिवराय यांचे काळीज कळणारी मानसे जन्माला यायला हवीत. राज्यातील प्रत्येक गावात, ग्रामपंचायतीत  धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळावा, असे आवाहनही भिडे यांनी केले.

हेही वाचा >>>पुणे: ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड’ मनोजकुमार, इनॉक डॅनियल यांना उषा मंगेशकर यांना एस. डी. बर्मन पुरस्कार जाहीर

गडकोट  मोहिमेसाठी आलेल्या हजारो धारकऱ्यांनी  शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर जुन्नर शहरात प्रवेश केला. जुन्नरकर नागरिकांनी जल्लोषात धारकऱ्यांचे स्वागत केले. शहरातील परदेशपुरा, नेहरुबाजार मित्रमंडळ, सराई पेठ, रविवार पेठ, कल्याण पेठ मित्रमंडळ तसेच शहरातील  विविध हिंदुत्ववादी संघटनानी पुष्पवृष्टी करत  धारकऱ्यांचे स्वागत केले. ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरासमोर लावलेल्या ४० फूट उंचीच्या भगव्या धवजाचे अनावरण करण्यात आले.

केवळ भाषणासाठीच व्यासपीठावर
सभास्थानी आलेल्या संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यासपीठावर न जाता जमिनीवर बैठक मारली. त्यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खाली आले. मात्र भिडे गुरुजी यांनी त्यांना व्यासपीठावर जाण्याचे आदेश दिले. मनोगत व्यक्त करण्यासाठी भिडे गुरुजी व्यासपीठावर गेले आणि भाषण झाल्यानंतर पुन्हा खाली येऊन बसले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:00 IST