scorecardresearch

बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या; संभाजी ब्रिगेडचा आरोप

“आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत.”

बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या; संभाजी ब्रिगेडचा आरोप
बाबासाहेबांबरोबरच राज ठाकरेंवरही साधला निशाणा

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या असा आरोप आखरे यांनी केलाय. तसेच राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असं आवाहनही आखरे यांनी केलं आहे.

एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना आखरे यांनी कठोर शब्दात राज यांच्या भूमिकेवर टीका केलीय. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असं आखरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचताय त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी शिवशाही बाबासाहेब पुरंदेरेंवरही टीका केलीय.

नक्की वाचा >> “हिंमत असेल तर राज ठाकरेंनी…”; संभाजी ब्रिगेडचं ‘चॅलेंज’

“राज ठाकरेंनी इतिहासासंदर्भात भाष्य केलं. काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे. सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. आपण प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस असला तरी विचारांचे वारसदार होऊ शकला नाहीत. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात,” असं आखरे यांनी म्हटलं आहे.

“बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं इतिहास लेखन हे दंगलीचं स्त्रोत पसरवणारं लेखन आहे. त्या माध्यमातूनच दंगली या महाराष्ट्रात झाल्या होत्या. पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत,” असं आखरे म्हणाले आहेत.

“तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू. आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो. तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू. तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा. वायफळ चर्चा आणि उगाच जिभेला आलं असं बोलून उगाच महाराष्ट्राला वेठीस धरु नका. महाराष्ट्र पुरोगामी असून महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे. तिचं जतन करण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं आहे,” असा दावाही आखरेंनी केलीय.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-08-2021 at 08:52 IST

संबंधित बातम्या