पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधीस्थळ वढू या दरम्यान नव्या रस्त्याची निर्मिती आणि भीमा नदीवरील पूल अशा कामांचा समावेश करण्यात आलेल्या तुळापूर वढू सुधारीत विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी ५३२.५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्याच्या शिखर समितीची मान्यता देण्यात आल्याने आराखड्याला गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, शिरूरचे आमदार माऊली कटके यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे सचिव यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण केले. छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण राज्याचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचे बलिदान स्थल तुळापूर आणि समाधी स्थळ वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचना विचारात ‌घ्याव्यात, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

सुधारीत आराखड्यानुसार तुळापूर-वढू बुद्रुक रस्ता भीमा नदीवरील पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा रस्ता १४ किलोमीटर लांबीचा असून नागरिकांना तुळापूरहून वढू बुद्रुक येथे येण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लोगात. नदीवरील पुलामुळे हा रस्ता साडेसहा किलोमीटर लांबीचा होणार असून या दोन्ही स्थळांमधील अंतर कमी होणार आहे. भीमा नदीवरील पूल ‘व्हिविंग गॅलरी’सह करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाची रचना छत्रपीत संभाजी महाराजांच्या काळातील इतिहासाची आठवण करून देणारी असावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले,‘ पुलाची उभारणी दर्जेदार पद्धतीने करण्यात येऊन नदीच्या घाटाचे कामही इतिहासाची आठवण करून देणारे असावे. नदीघाट आणि पुलावर प्रकाश योजना आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

असा असेल विकास आराखडा

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, ८२ आसन क्षमतेचा १०-डी शोचे सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, ३५० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, स्वच्छतागृहे आणि उपाहारगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. तर समाधी स्थळी वढू बुद्रुक येथे प्रशासकीय इमारत, संग्रहालय, १२० मीटर लांबीचा नदी काठ, वाहनतळ करण्यात येणार असून भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची व्हिव्हिंग गॅलरी असून तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना आहे.

पुलाची रुंदी वाहतुकीला पर्याप्त असावी. रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. – अजित पवार, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री