पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकातील स्थापत्य आणि विद्युतविषयक कामाच्या निविदेमध्ये ‘रिंग’ झाल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेनेच्या (शिंदे) नगरसेवकांनी आंदोलन केले. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नगरसेवकांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, यश साने, विराज लांडे, पंकज भालेकर, नगरसेविका सुलभा उबाळे, संगीता ताम्हाणे, दीप्ती कांबळे, उज्ज्वला ढाेरे आंदोलनात सहभागी झाले.

महापालिकेच्या वतीने मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. या कामासाठी आतापर्यंत ६५ काेटी रुपयांचा खर्च करण्यात आला. पुतळा परिसरात स्थापत्य आणि विद्युतविषयक काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ५० काेटी रुपयांच्या दाेन स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. या दाेन्ही निविदांमध्ये ‘रिंग’ झाल्याचा आराेप विराेधकांनी स्थायी समितीमध्ये केला हाेता. तसेच, दाेन्ही विषय मंजूर करू नयेत, अशी मागणी केली हाेती. मात्र, भाजपने दाेन्ही विषय साेमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केले. त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.