शाळा, महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंदच; करोना आढावा बैठकीत निर्णय
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोनाबाधितांचा दर काही प्रमाणात कमी झाला असला, तरी यापुढील काळात रुग्णदर वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त के ली आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध लागू आहेत, तेच निर्बंध पुढील सात दिवस कायम राहतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी दिली. मात्र, पुणे तिसऱ्या स्तरात गेल्यामुळे शहरातील काही निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्य़ातील शाळा, महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोना सद्य:स्थिती आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘दुसरी लाट ओसरत असल्याने काही सवलती दिल्या आहेत. मात्र, आगामी काळात रुग्णसंख्या वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सध्या असलेलेच निर्बंध कायम राहतील. शाळा, महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबतचा निर्णय घेतील.’
दरम्यान, सध्या पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असून शहरासह जिल्ह्य़ात लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. देशातही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने प्रशासनाकडून त्यादृष्टीने तयारी आणि नियोजन करण्यात येत आहे. पुणेकरांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असून पर्यटन, खरेदीच्या निमित्ताने अनेक जण घराबाहेर पडत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पालकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
लग्न समारंभामध्ये वाढणारी गर्दी हा सध्या चिंतेचा विषय असून संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे मंगल कार्यालये, हॉटेलचालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच खासगी रुग्णालयांकडून उपचारासाठी मोठी अनामत रक्कम घेऊन जादा रकमेची देयके आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
संभाव्य निर्बंध
करोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या आणि करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने राज्य सरकारने निर्बंध शिथिलतेच्या नियमावलीत बदल के ला असून पुणे शहराचा समावेश तिसऱ्या गटात झाल्याने पुण्यासाठी निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, हॉटेल आणि रेस्टॉरंट दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने आणि त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा सुरू राहील, मॉल बंद राहतील या निर्बंधांच्या समावेशाची शक्यता आहे.