पुणे : ‘आयुष्याच्या वाटचालीत गवसलेली प्रेमाची विविध रूपे कवितांमध्ये प्रतिबिंबित झाली आहेत. अवखळ वयातच कविता सुचते असे नाही. प्रेमावरील कविता लिहायला वयाचे बंधन नसते,’ अशी भावना प्रसिद्ध कवी-गीतकार संदीप खरे यांनी शनिवारी व्यक्त केली.

रंगत-संगत प्रतिष्ठानातर्फे ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त प्रसिद्ध संदीप खरे यांचा ज्येष्ठ कवयित्री हेमा लेले यांच्या हस्ते प्रेमकवी पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी खरे बोलत होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध लेखक-कवी डॉ. आशुतोष जावडेकर, प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रमोद आडकर, मैथिली आडकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या मळ्यात’, ‘आपण काय करणार’ या कविता ऐकवून त्यांनी रसिकांना प्रेम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी रसिकांनीही टाळ्यांचा ताल धरत खरे यांच्या सुरात आपला सूर मिसळला.

लेले म्हणाल्या, ‘कविता केवळ कागदावर उमटून चालत नाही, तर कविता खऱ्या अर्थाने जगायची असते. साहित्यातील सर्वोच्च गोष्ट म्हणजे कविता. आयुष्य जगत असताना तन-मनाने आयुष्याचा धागा विणत गेल्यास आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो.’

‘संदीप खरे यांच्या कवितांची समीक्षात्मक चिकित्सा व्हावी’, अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, ‘कवितेला सशक्त परंपरा आहे. कवितेचे धागे संतसाहित्यातही दिसतात. लयबद्धता, नादब्रह्मता हे संदीप खरे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेपासून दूर गेलेल्या युवा पिढीला काव्याच्या माध्यमातून मराठी भाषेची गोडी लावली असून भाषेविषयची असलेली मरगळ दूर सारली आहे.’

प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सन्मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन  केले. उत्तरार्धात ‘प्रेम’ या विषयावरील कविसंमेलनात शिवप्रिया सुर्वे, डॉ. ज्योती रहाळकर, निरुपमा महाजन, स्वप्निल पोरे, तनुजा चव्हाण, प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, वि. दा. पिंगळे, विजय सातपुते, वैजयंती आपटे, सुजित कदम यांनी कविता सादर केल्या. प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले.