पुणे : ‘पारतंत्र्यातील विलासापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढताना येणारे मरण हे कैक पटींनी श्रेष्ठ आहे,’ असा संदेश देणारे मास्टर दीनानाथ यांच्या अलौकिक स्वरांनी गाजलेल्या पदांनी भारलेले आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी बंदी घातलेले ‘संगीत रणदुंदुभी’ हे नाटक मंगळवारी (१७ फेब्रुवारी) शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे.
‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे नायिका तेजस्विनी हिच्या तोंडी गाजलेले पद पुढे आशा भोसले यांनी अजरामर केले. ‘उत्तम गायिका-अभिनेत्री असेल, तर अजूनही हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी भरत नाट्य संशोधन मंदिर संस्था उत्सुक आहे,’ असे संस्थेचे रवींद्र खरे यांनी सांगितले. त्यांनी २५ वर्षांपूर्वी हे नाटक दिग्दर्शित करून रंगमंचावर आणले होते.
‘वीर वामनराव जोशी यांनी लिहिलेल्या ‘रणदुंदुभी’ नाटकाचा पहिला प्रयोग १७ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला होता. ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’तून बाहेर पडल्यानंतर मा. दीनानाथ मंगेशकर आणि नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांनी स्थापन केलेल्या ‘बळवंत नाटक मंडळी’ संस्थेने या नाटकाची निर्मिती केली होती. पं. रामकृष्णबुवा वझे यांनी अभिजात रागसंगीतावर आधारित या नाटकातील पदांची स्वररचना केली होती,’ अशी माहिती संगीत रंगभूमीचे अभ्यासक आणि बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी दिली.
‘पिलू रागातील ‘परवशता पाश दैवे’, मालकंस रागातील ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’, तिलककामोद रागातील ‘वितरि प्रखर तेजोबल’, गज़लच्या अंगाने जाणारे ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा’ आणि ‘आपदा राज पदा भयदा’ ही पदे दीनानाथांच्या स्वरांनी अजरामर झाली होती. एवढेच नव्हे, तर या नाटकावर केवळ दीनानाथांचीच नाममुद्रा होती,’ असे त्यांनी नमूद केले.
‘या नाटकाचा पुण्यात भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या प्रयोगाला पं. हृदयनाथ मंगेशकर आणि भारती मंगेशकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीनानाथांच्या पायपेटीचे पूजन करून प्रयोग झाला होता. ही पायपेटी संस्थेच्या संग्रहात आहे,’ असे खरे यांनी नमूद केले.
मुंबईतील प्रयोगाची अनोखी आठवण
‘मा. दीनानाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच सन २००० मध्ये भरत नाट्य मंदिर संस्थेने ‘रणदुंदुभी’ नाटकाची निर्मिती केली होती. त्याचा पहिला प्रयोग मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये झाला होता. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे दीनानाथांना अभिवादन करण्यासाठी चारुदत्त आफळे (तेजस्विनी), विश्वास पांगारकर (सौदामिनी) या पुरुषांनी नायिका साकारल्या होत्या. मी नाटकाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच परकीय युवराज ही भूमिका केली होती. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर ही पाचही मंगेशकर भावंडे या प्रयोगाला आवर्जून उपस्थित होती,’ अशी आठवण रवींद्र खरे यांनी सांगितली.

