पुणे : सांगली पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाने डेक्कन जिमखाना परिसरातील एका लॉजमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. गुडघेदुखीमुळे उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे.
सूरज मराठे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मराठे यांचे प्रशिक्षण नुकतेच संपले होते. प्रशिक्षणानंतर सांगलीतील तासगाव पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. उपचारांसाठी ते पुण्यात यायचे. बुधवारी ते पुण्यात आले होते. डेक्कन जिमखाना परिसरातील एका लॉजमध्ये ते मुक्कामी होते. रुग्णालयातून ते लॉजवर गेले. त्यानंतर त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. लाॅजमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली. मराठे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. माझ्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरू नये, असे मराठे यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
