पिंपरी : गावी जाताना दरवाजाला कुलूप लावून बाहेर चावी ठेवणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेऊन एका महिलेने सांगवी येथे दोन घरफोड्या केल्या. गुन्हे शाखा युनिट एकने सांगवी ते वारजे माळवाडी पर्यंत सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपी महिलेची ओळख पटवली. त्यानंतर तिला अटक करत तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले.

सुमन दत्ता लोंढे ( वय ३५, रा. अचानक चौक, रामनगर वारजे माळवाडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकने केला. पथकाने सांगवी ते वारजे माळवाडी दरम्यान सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक महिला चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी महिलेची माहिती घेत तिला अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान तिच्याकडे तपास करत तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. महिलेने मागील वर्षी सांगवी येथे आणखी एक घरफोडी केल्याचे सांगितले.

नागरिक घरातून बाहेर जाताना घराला कुलूप लावतात, मात्र चावी दरवाजाच्या बाहेर कुठेतरी लपवून ठेवतात. चावी लपवून ठेवणाऱ्या नागरिकांवर आरोपी महिला पाळत ठेवत असे. त्यानंतर संधी साधून तिने या चोऱ्या केल्या होत्या. महिलेला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल उषा दळे, महादेव जावळे, शिवराम भोपे, अजय डगळे, जयवंत राऊत, देवा राऊत, विजय शेळकंदे, तेजस भालचिम, संदेश देशमुख, विजय जानराव यांनी केली आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ज्येष्ठाची दोन कोटींची फसवणूक

शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली.या प्रकरणात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या वतीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले होते. त्यांना १० ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका लिंकद्वारे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेगवेगळ्या शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एकूण २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपये विविध बँक खात्यात भरण्यास लावले. ॲपवर खोटा नफा दाखवून प्रत्यक्षात त्यांची फसवणूक करण्यात आली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ट्रेडिंगचे आमिष दाखवून ३० लाखांचा गंडा

जादा नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करायला लावून त्यांची ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २३ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चिखली येथील राजे शिवाजी नगर येथे घडली.या प्रकरणात एका व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले होते. तेथील महिला ॲडमीनने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक ट्रेडिंग ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३० लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. गुंतवलेले पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. चिखली पोलीस तपास करत आहेत.