येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने पुन्हा संचित रजेसाठी (पॅरोल) विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला आहे. हा अर्ज सध्या प्रलंबित आहे. दोन वर्षांच्या शिक्षेच्या कालावधीत संजय दत्त याने संचित आणि अभिवचन (फलरे) रजेवर १३२ दिवस बाहेर काढले आहेत. आता पुन्हा दुसऱ्यांदा त्याने पॅरोलसाठी अर्ज केला आहे. त्यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील त्याने अठरा महिने शिक्षा भोगली आहे. २१ मे २०१३ पासून संजय दत्त येरवडा कारागृहात आहे. सुरुवातीला साडेचार महिने शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्तने स्वत:च्या पायाच्या दुखण्याचे कारण देत ऑक्टोबर महिन्यात चौदा दिवसांची संचित रजा घेतली. त्यात पुन्हा आणखी चौदा दिवसांची वाढ मागून घेतली. २८ दिवस अभिवचन रजेवर जाऊन आल्यानंतर पत्नीच्या आजारपणाचे कारण देत विभागीय आयुक्तांकडून त्याने २१ डिसेंबर २०१३ रोजी तीस दिवसांची संचित रजा मिळवली. त्यामध्ये सलग दोन वेळा मुदतवाढ त्याने घेतली होती. २१ मार्च २०१४ मध्ये तो पुन्हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला होता. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०१४ मध्ये त्याला चौदा दिवसाची अभिवचन रजा मिळाली होती. म्हणजे २१ मे २०१३ पासून आतापर्यंत त्याने १३२ दिवस कारागृहाबाहेर काढले होते. त्याला देण्यात येणाऱ्या संचित व अभिवचन रजेच्या विरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत कारागृहाकडून दिल्या जाणाऱ्या फर्ले आणि पॅरोल यामध्ये मोठे बदल करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, त्याला दिलेल्या फर्लेच्या रजेवरून मोठे वादंग झाले होते. फर्लेवरून परतल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा संजय दत्त याने २६ मार्च रोजी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पॅरोलसाठी अर्ज केला आहे. तो अर्ज अद्याप प्रलंबित आहे. त्यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.