मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त कारागृहाच्या मागील दरवाजातूून चौदा दिवसांच्या सुट्टीवर बुधवारी दुपारी बाहेर पडला. कारागृह प्रशासनाने त्याला मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा (फलरे) मंजूर केली होती.
येरवडा कारागृहात संजय दत्त शिक्षा भोगत आहे. त्याला न्यायालयाने पाच वर्षे शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी अठरा महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली असून मे २०१३ पासून तो कारागृहात आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कैद्याला चौदा दिवसांची अभिवाचन रजा दिली जाते. त्यानुसार त्याने अर्ज केल्यानंतर अभिवाचन रजा मंजूर केली होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बुधवारी दुपारी त्याला येरवडा कारागृहाच्या मागील दरवाजातून दुपारी एकच्या सुमारास सुट्टीवर सोडण्यात आले. याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की संजय दत्तला सोडताना कारागृहाबाहेर आंदोलन होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती. त्यामुळे त्याला पाठीमागील दरवाजातून बाहेर सोडण्यात आले.