शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे यांची भोंग्याबाबत असलेली भूमिका आणि त्यांना असलेल्या भाजपाच्या छुप्या पाठिंब्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही हिंदुत्वाच्या विरोधात असून त्यांच्या याच भूमिकेमुळे शिर्डीतील साईबाबा मंदिरात आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होऊ शकली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पुण्यात टीव्ही 9 या वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की “राज ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार होते पण भाजपाने त्यांच्या व्यंगचित्राचा गळा घोटला आहे तर भोंग्यांच्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाने राज ठाकरे यांच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटलाय. अनेक व्यंगचित्रकारांना हल्ली लाईनही वाचता येत नाही तर काही व्यंगचित्रकार आपली लाईन बदलतात.”
देवेद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत विचारलं असता भाजपा गोंधळलेला पक्ष असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. औरंगाबाद आणि ठाण्यात सभा घेत राज ठाकरे यांनी याबाबत प्रचंड आक्रमक भूमीका घेतली होती. यानंतर पोलीस प्रशाससाने कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुठल्याही ठिकाणी भोंगा लावण्यास सक्त मनाई करण्यात आली. यामुळे अनेक मंदिरातसुद्धा काकड आरतीच्या वेळी भोंग्याचा वापर करता आला नाही. नेमका हाच धागा पकडून संजय राऊत यांनी राज यांच्या माध्यमातून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकीत कोण जिंकणार? या प्रश्नावर उत्तर देतना, जर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढले तर सर्व महानगर पालिकांवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल. असा दावा संजय राऊत यांनी केला.