भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर शिवसेनेने अग्रलेख लिहीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधल्यानंतर पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रावरून पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप मान्य नाही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावरुन आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

“संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे सव्वा रुपया मूल्यांकन केले. अहंकारी संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांची किंमत ही सव्वा रुपया असल्याने सव्वा रुपयांचा मानहाणीचा दावा करणार आहे अस म्हटलं आहे. तुमच्या ठाकरे सरकारचे नेते किरीट सोमय्याला दर आठवड्याला १०० कोटींची नोटीस पाठवतात. किरीट सोमय्यांच मूल्यांकन तुम्ही साडेपाच कोटी करत आहात काय? संजय राऊत तुमची  व्हॅल्यू ५५ लाखांची आहे. पीएमसी बॅंकेतील ५५ लाखांची रक्कम तुम्ही चोरली होती. तुम्ही काय आमचं मूल्यांकन करणार,” असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे. सोमय्या पुण्यात तळेगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अधिक तपशील घेण्यासाठी पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या सोबत पारनेर साखर कारखान्यास किरीट सोमय्या भेट देणार आहे. ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला. पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत. ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.

“पारनेर साखर कारखाना बचाव समिती यांच्या विनंतीला मान देऊन पारनेरला जात आहे. यामध्ये २२ हजार शेतकऱ्यांची लूट करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात स्वप्न पाहिले होते. मात्र, काही व्यक्तींनी कारखाना गिळंकृत केला आहे. त्या शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मी पारनेरला निघालो आहे. दुपारी साडेबारा वाजता कारखाना बचावसमिती आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे,” असे सोमय्या यांनी म्हटले.

मी कोल्हापूर ला जाणार…

“मी २६ तारखेला रविवार रोजी अलिबागला जाणार आहे. त्यानंतर २८ तारखेला आंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहे. मी हे ठाकरे सरकारला कळवलं आहे. आता पाहुयात ठाकरे सरकार पुन्हा एकदा घोटाळेबाज हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी मला पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करतय.  कोल्हापूर पासून साताऱ्याला अजित पवार यांच्या जरंडेश्वर यांच्या कारखान्याची तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहे,” असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.