scorecardresearch

“पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”; उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्वीट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केलीय.

Sanjay Raut Anand Dave
संजय राऊत व आनंद दवे (संपादित छायाचित्र)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केलीय. संजय राऊत यांनी ट्वीट करत यावर आपली भूमिका मांडली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजस्थानमधील उदयपूरमध्ये ज्या प्रकारे हत्याकांड झालं त्याचाही उल्लेख केला. राऊतांच्या या ट्वीटवर आता पुणे पोलीस काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

संजय राऊत म्हणाले, “ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.”

दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेतील बंडखोरांवरही टीकास्त्र डागलं. मंगळवारी (५ जुलै) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय. “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत म्हणाले, “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.”

हेही वाचा : “५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा

“जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

आदित्य ठाकरे सोडून १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस, राऊत म्हणाले…

शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, “ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही त्यांनी लक्षात ठेवावं जे इतर १४ आमदार आहेत तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut tweet to pune police on anand dave security threat mention udaypur murder incident pbs

ताज्या बातम्या