पिंपरी : टाळमृदंगाचा टिपेला गेलेला गजर, ज्ञानोबा-माउली नामाचा अखंड जयघोष, देहभान विसरुन नाचणारे वैष्णव, पालखीकडे खिळलेल्या वारकऱ्यांच्या नजरा, अशा भक्तीमय वातावरणात वीणा मंडपातील पालखी खांद्यावर घेतली अन् भाविकांच्या उपस्थितीत पुंडलिका वरदे हरि विठ्ठलचा जयघोष झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने बुधवारी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने प्रारंभ झाला. काकडा, पवमान अभिषेक, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता महानैवेद्य अर्पण केल्यानंतर दर्शन बंद करुन मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. दुपारी अडीच वाजल्यापासून प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली.
माउलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार घालण्यात आला. रथापुढे व रथामागे असणाऱ्या मानाच्या ४७ दिंड्यांमधील प्रत्येकी ५० वारकऱ्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली. वीणा-टाळ-मृदंगाच्या गजराने माउली तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता. दुपारी तीनच्या सुमारास पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
श्रीगुरू हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माउली संस्थानातर्फे श्रींची आरती झाली. वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. सर्वांच्या मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माउली माउली’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळ्याची रंगत वाढतच गेली. सोहळा सुरू असताना दिंड्यांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माउलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आणण्यात आले. अश्वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. अश्व महाद्वारातून बाहेर पडताच रथापुढील दिंड्या मंदिराबाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
पालखीचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात
उत्साही वातावरणात पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली. पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
