पिंपरी : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असणा-या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आषाढी वारीसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी, भाविक आणि दिंड्या गुरुवारपासून आळंदीत दाखल होतील.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान शनिवारी (२९ जून) देऊळवाड्यातून होणार आहे. मंदिरातून प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर ३० जून रोजी श्रींचा पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो. यापार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ महाराज म्हणाले, की यंदाचा १९३ वा पालखी सोहळा आहे. २९ जून रोजी महाराजांच्या पालखीचे दुपारी चार वाजता प्रस्थान होईल. प्रस्थान सोहळ्यासाठी यावर्षी ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिदिंडी ९० वारकरीच प्रस्थानासाठी मंदिरात येतील. चांदीच्या रथाला पॅालिश करण्यात आले आहे. देवांचे राजेशाही अंलकार, सरजाम, चांदीचे भांडे, सिंहासन सर्व तयारी पूर्ण झाली आहे. श्री गुरू हैबतबाबांनी ठरवून दिलेले प्रथेप्रमाणे सोहळा पार पडेल.

हेही वाचा >>>ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई

देवस्थान प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, दिंडेकरी, फडकरी, मानकरी, पोलिसा यंत्रणा, गावक-यांसमवेत बैठका झाल्या आहेत. आता प्रस्थान सोहळ्याची प्रतीक्षा आहे. प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. वारक-यांसाठी पाणी, सुरक्षाची व्यवस्था केली. प्रशासनाकडून वैद्यकीय मदत पुरविली जात आहे. १४० वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. शासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे. पहिल्या विसावाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. पहिल्या विसाव्यातील श्रींच्या पादुका पूजन, आरती प्रसंगी मंदिरात केवळ पासधारकांनाच सोडण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध केले आहेत. सिद्धबेट, नदी घाट, नवीन पुलासह संपूर्ण महत्वाच्या ठिकाणीची स्वच्छता पूर्ण झाली आहे. वारीकालावधीत तीन पाळ्यांमध्ये साफसफाई केली जाणार आहे. १८०० फिरत्या शौचालयांची उपलब्धता केली आहे. दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहे. ६० ठिकाणी १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तीन बोट तैनात ठेवल्या आहेत.-कैलास केंद्रे, मुख्याधिकारी,आळंदी नगरपरिषद