पिंपरी : पावसाचा जोर कमी झाला असला, तरी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने बुधवारी (८ जुलै) होणारा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, इंद्रायणी पुलावरील कठडे व वीजखांब पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
आळंदी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा करणारा पंप पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली दर्शनबारी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. ४०० मोबाइल शौचालये पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने तसेच तंबू व राहूच्या जागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या निवास, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे अशक्य असल्याचे संस्थान कमिटीने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांनी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नये, असे आवाहन संस्थान कमिटीने केले आहे. हवामान आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील मुक्कामापासून वारीत सहभागी होण्यासंदर्भात संस्थांनकडून सूचना करण्यात आलेल्या आहेत.
पूल कमकूवत झाल्याची शक्यता
आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. दोन पुलांवरील पाणी कमी झाले असून, दोन पूल पाण्याखाली आहेत. पुलाचे कठडे तुटले आहेत. जलपर्णी अडकल्याने पूल कमकूवत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतरच चारही पूल वाहतुकीसाठी खुले केले जाणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
पालखीचे दुपारी प्रस्थान
संजीवन समाधी मंदिरात दुपारी तीन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ दहा वारकऱ्यांचा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एक हजार ६६० व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे.
