पिंपरी : पुण्यातील भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची जागा वारकऱ्यांसाठी अपुरी आहे. त्यामुळे दर्शनासाठी होणारी गैरसोय, अरुंद रस्ते, दोन दर्शनबारी आणि वाहतूक कोंडी या सर्व गोष्टींचा विचार करून दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी, विश्वस्तांनी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम अन्यत्र हलविण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे ठरले आहे.
परंतु, त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामाच्या जागेला अन्यत्र पर्याय निवडण्यासंदर्भात अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर केला जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ च्या नियोजनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठक २८ मार्च रोजी ऋषिकेश महाराज आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे संपन्न झाली. पालखी प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीस ८ जुलै २०२६ रोजी होईल. दिंडी समाजाच्या मागणीवरून दुपारी चार ऐवजी दुपारी तीन वाजता प्रस्थान होईल. पुणे ते सासवड या प्रवासादरम्यान सासवड मुक्कामी पोहचण्यास प्रतीवर्षी रात्री दहाच्या पुढे वेळ होतो. याबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाल्याचे ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले.
पुण्यातील भवानीपेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथील दोन दिवसात मुक्कामाच्या जागेबाबत दिंडी समाज संघटनेने अनेक अडचणी मांडल्या आहेत. येथील जागा अतिशय अपुरी आहे. दरवर्षी ठिकाणी गर्दी वाढत आहे. मंदिरात गर्दीच्या तुलनेत जागा उपलब्ध नाही.
अरुंद रस्ते व त्यातच दोन दर्शनबारी यामुळे पूर्ण रस्ते तुडुंब भरतात. दर्शनबारीतील भाविकांना सोयीसुविधा प्राप्त होत नाहीत. पावसाचे दिवस असल्याने महिला भगिनी व लहान बालके यांची कुचंबना होते. भाविकांना पावसात उभे रहावे लागते. पिण्याच्या पाण्याची गैरसोय असते. वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील मुक्कामाबाबत सर्व दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी व विश्वस्त यांनी एकमताने याचा गांर्भीर्याने विचार करावा असे ठरले आहे.
पर्यायी जागा उपलब्ध होत असतील तर त्याचाही विचार केला जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय १३ एप्रिल २०२६ रोजी दिंडी संघटना प्रतिनिधी, मानकरी व विश्वस्त मंडळ यांच्या बैठकीत निश्चित केला जाणार आहे. तसेच आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेसही याच बैठकीत मान्यता देण्यात येणार असल्याचे ॲड. उमाप यांनी सांगितले.
