पिंपरी : आषाढी पायीवारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी आळंदी येथील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रथा, परंपरेनुसार दुपारी तीनच्या सुमारास माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल. सुविधेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या हमीपत्रानुसार पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच होणार आहे. याबाबतची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
आळंदी देवस्थानच्या भक्त निवास येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, ॲड. रोहिणी पवार, भाऊ महाराज फुरसुंगीकर, व्यवस्थापक माऊली वीर आणि दिंडी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावर्षीचा पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ८ जुलै २०२६ रोजी दुपारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे आळंदी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. त्यानंतर ९ आणि १० जुलै २०२६ रोजी सोहळा पुण्यातील भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावेल. या निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पत्रव्यवहार आणि बैठकांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
प्रशासनाकडून भवानी पेठेत सुविधांची लेखी हमी
पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या जागेची टंचाई आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे मुक्कामाची जागा बदलण्याबाबत चर्चा सुरू होती. भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथील मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हमी दिली आहे. गर्दीचे नियोजन आणि जागेची उपलब्धतता वाढवण्यासाठी मंदिराशेजारील तीन खासगी मिळकती ताब्यात घेण्याबाबत बैठक घेण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवून तो भाग मोकळा करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखीपत्राद्वारे देवस्थानला सांगितले आहे.
कोठे होणार पालखीचा मुक्काम?
९ व १० जुलै रोजी पुण्यातील मुक्कामानंतर ११ व १२ जुलै रोजी सासवड मुक्कामी, १३ जुलै जेजुरी, १४ जुलै वाल्हे, १५ जुलै श्रींचे नीरा स्नान, लोणंद मुक्कामी, १६ जुलै (चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले) तरडगाव रात्री मुक्कामी, १७ जुलै फलटण रात्री मुक्कामी, १८ जुलै बरड, १९ जुलै नातेपुते, २० जुलै (पुरंदवडे गोल रिंगण पहिले ) माळशिरस, २१जुलै (खुडूस फाटा गोल रिंगण दुसरे) रात्री वेळापूर मुक्कामी, २२ जुलै (ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण तिसरे), (पहिला टप्पा संत सोपानदेव भेट ) रात्री भंडीशेगाव मुक्कामी, २३ जुलै (बाजीरावची विहीर उभे रिंगण दुसरे, गोल रिंगण चौथे) रात्री वाखरी मुक्कामी, २४ जुलै (पादुका जवळ आरती व उभे रिंगण तिसरे) पंढरपूर, २५ जुलै पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.
पालखीचा परतीचा प्रवास
२८ जुलै पर्यंत सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. २९ जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट , पादुकांजवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे. परतीचा प्रवास २९ जुलै वाखरी, ३० जुलै वेळापूर, ३१ जुलै नातेपुते, १ ऑगस्ट फलटण, २ ऑगस्ट पाडेगाव, ३ ऑगस्ट (श्रींचे नीरा स्नान)वाल्हे, ४ ऑगस्ट सासवड, ५ ऑगस्ट हडपसर, ६ ऑगस्ट (भवानी पेठ)पुणे, आळंदी,७ ऑगस्ट पुणे, ८ ऑगस्ट रोजी पुण्याहून आळंदी कडे पालखी सोहळा येणार आहे. ९ ऑगस्ट रोजी आळंदीत पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने सुविधांबाबत लेखी आश्वासन दिले आहे. पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करणे आणि रस्ते रुंदीकरण यामुळे सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने आणि जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पुण्यात भवानी पेठेत पूर्वीच्याच ठिकाणी मुक्काम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. – ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख
