पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी राष्ट्रीय चाचणी संचलन संस्थेतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट-यूजी फेरपरीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. पंजाब आणि हरियाणा येथील अनुक्रमे आर्यन गुप्ता आणि पंशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुणांसह देशात संयुक्त पहिला क्रमांक मिळवला असून, ११.२१ लाख विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. ही परीक्षा आधी मेमध्ये आयोजिली होती, परंतु पेपरफुटीमुळे रद्द होऊन ही पुन्हा घ्यावी लागली.

‘एनटीए’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाबाबत माहिती दिली. नीट फेरपरीक्षा २१ जून रोजी देशभरातील ५५१ शहरातील ५४४० परीक्षा केंद्रांवर १३ भाषांमध्ये घेण्यात आली. सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी ती दिली. त्यापैकी ९३ टक्के विद्यार्थ्यांचा हा पहिला प्रयत्न होता. परीक्षेत पात्र ठरलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक मुली आहेत.

निकालातील पहिले १३८ विद्यार्थी ६६ विविध शहरांतील आहेत. तसेच, ७०५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले १७ गुणवंत विद्यार्थी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू, तेलंगणा या आठ राज्यांतील असल्याचे ‘एनटीए’ने स्पष्ट केले.

किती विद्यार्थ्यांना किती गुण?

७२० पैकी ७०० गुण : १९

६५० आणि त्यापेक्षा जास्त : १४९२

६०० आणि त्यापेक्षा जास्त : १० हजार १६०

५०० आणि त्यापेक्षा अधिक : ९० हजार ७८०

प्रवर्गनिहाय पात्र विद्यार्थी संख्या

सर्वसाधारण : २ लाख ९१ हजार

ओबीसी-एनसीए : ५ लाख १२ हजार

अनुसूचित जाती प्रवर्ग (एससी) : १ लाख ५९ हजार

अनुसूचित जमाती प्रवर्ग (एसटी) : ६३ हजार ७१६

आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) : ९५ हजार २६

पीडब्ल्यूबीडी : ३,६६६

पीडब्ल्यूडी : ३०३