जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीत श्री संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याने प्रवेश केला. भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याने जेजुरीनगरीत प्रवेश केल्यावर नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपाध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, श्री मार्तंड देवस्थानाचे मुख्य विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, मंगेश घोणे, पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, अनिल सौंदडे, अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, तहसीलदार विक्रम रजपूत यांनी स्वागत केले.
गेले दोन दिवस पुरंदर तालुक्यात कडक ऊन पडले असताना सासवड ते जेजुरी हा १७ किलोमीटरचा टप्पा पार करून पालखी सोहळा होळकर तलावाच्या काठी असलेल्या पालखी तळावर विसावला. सायंकाळी सात वाजता समाज आरती झाली. या वेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जेजुरीतील छत्रीचे मंदिर, शाळा, सांस्कृतिक भवन आणि मोकळ्या माळावर दिंड्या उतरल्या. वारकऱ्यांसाठी नगरपालिकेने टँकरने पाण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांसाठी भोजन, औषधोपचार अशा सुविधा पुरवण्यात आल्या. पालखी सोहळ्यात चालून पाय दुखत असले, तरी खंडोबाच्या ओढीने ४०० पायऱ्या चढून आज हजारो भाविक खंडोबा गडावर दर्शनासाठी गेले. पंढरीला जाता जाता लाडक्या खंडेरायाचे दर्शन झाल्याचे समाधान या भाविकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. रात्री उशिरापर्यंत खंडोबा गडावर वारकऱ्यांची गर्दी होती.
