पिंपरी : आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून सात जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हा पायी पालखी सोहळा १८ दिवसांचा प्रवास करून २४ जुलै रोजी पंढरीत दाखल होईल. यंदा पालखी सोहळ्याचे ३४१ वे वर्ष आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानाने याबाबत माहिती दिली.

पालखीचे प्रस्थान सात जुलै रोजी होणार असून, पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल. पालखी इनामदार वाड्यातून आठ जुलै रोजी बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ थांबेल, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात विसावेल.

कोठे होणार पालखीचा मुक्काम?

९ व १० जुलै : पुण्यात नाना पेठेत
११ जुलै : लोणी काळभोर
१२ जुलै : यवत
१३ जुलै : वरवंड
१४ जुलै : उंडवडी गवळ्याची
१५ जुलै : बारामती येथील शारदा प्रांगणात
१६ जुलै : (काटेवाडी मेंढ्याचे रिंगण) सणसर पालखी तळावर रात्री मुक्काम
१७ जुलै : (बेलवाडी गोल रिंगण पहिले) निमगाव केतकी
१८ जुलै : (इंदापूर दुसरे गोल रिंगण) इंदापूर पालखी तळ
१९ जुलै : सराटी
२० जुलै : निरा स्नान (अकलूज माने येथे तिसरे गोल रिंगण) आणि पालखी तळावर रात्रीचा मुक्काम
२१ जुलै : (माळीनगर पहिले उभे रिंगण) बोरगाव मुक्काम
२२ जुलै : पिराची कुरोली
२३ जुलै : (बाजीराव विहीर दुसरे उभे रिंगण) वाखरी पालखी तळावर रात्रीचा मुक्काम
२४ जुलै : (पादुका जवळ आरती व उभे रिंगण तिसरे) पंढरपूर<br>२५ जुलै : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा.

पालखीचा परतीचा प्रवास

२८ जुलैपर्यंत सोहळा पंढरीत विसावेल. २९ जुलैला वाखरी, ३० जुलैला म्हाळुंगे माकडाचे येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम, ३१ जुलै वडापुरी, १ ऑगस्ट लासुर्णे, २ ऑगस्ट बऱ्हाणपूर, ३ ऑगस्ट हिंगणीगाडा, ४ ऑगस्ट वरवंड, ५ ऑगस्ट कुंजीरवाडी फाटा, ६ व ७ ऑगस्ट पुण्यातील नवी पेठ, ८ ऑगस्ट रोजी पिंपरीगाव आणि ९ ऑगस्ट रोजी पालखी सोहळा देहूत दाखल होणार आहे.