इंदापूर : विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा लयबद्ध निनाद आणि पंढरीच्या भेटीची उत्कट आस मनात साठवत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी यवत येथील मुक्कामानंतर वरवंडला विसावला.

यवतकरांचा निरोप घेत पालखी सोहळ्याचा पहिला विसावा भांडगाव येथे झाला. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनानंतर हरिनामाच्या गजरात पालखीने पुढील प्रवास सुरू केला. दुपारनंतर केडगाव-चौफुला येथे परंपरेनुसार पालखीचा मान स्वीकारण्यात आला. चौफुला परिसर हा वारकरी, भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. मानाचा सोहळा पार पडल्यानंतर पालखी वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दिवसभर उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता. मात्र, विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि नामस्मरणाच्या उत्साहामुळे वारकऱ्यांच्या पावलांचा वेग कुठेही मंदावला नाही. श्रमभार विसरून वैष्णवांचा अखंड प्रवास सुरूच होता. सायंकाळच्या सुमारास पालखी सोहळा वरवंड येथे मुक्कामी दाखल झाला. गावाच्या वेशीवर ग्रामस्थांनी फुलांची उधळण, आरती आणि हरिनामाच्या जयघोषात पालखीचे यथोचित स्वागत केले. पालखीच्या आगमनाने वरवंड गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.

मुक्कामस्थळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी मंडळे सज्ज होती. वैष्णवांसाठी भोजन, फराळ, चहा, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. ‘वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा’ या भावनेतून वरवंडकरांनी हजारो वैष्णवांचे आदरातिथ्य केले. सेवाभाव, समर्पण आणि भक्तीचा संगम अनुभवत पालखी सोहळा सोमवारी वरवंडच्या मुक्कामी विसावला.