पिंपरी : ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी मंगळवारी दुपारी देहूतून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहूनगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. पालखीचा पहिला मुक्काम देहुतच इनामदारवाड्यात असणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा ३४१ वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झाली. शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा झाली. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले.
दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी पालखीने प्रस्थान ठेवले. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा, पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. उद्या बुधवारी सकाळी पालखी पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.

पावसाची विश्रांती
पुणे जिल्हा आणि मावळ, देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीची दोन्ही पात्रे दुथडी भरून वाहत असून आळंदी व देहू परिसरातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस पाहता वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले होते. परंतु, मंगळवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे वारकरी देहूत दाखल झाले होते.
