पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. २०११ आणि २०१७ अशा दोन वेळी मिळून एकूण सात वेतनवाढी रोखण्याची कारवाई केल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र या कारवाईकडे दुर्लक्ष करू केंद्र सरकारने डॉ. पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड केल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्र सरकारकडून जेएनयूच्या कुलगुरुपदी डॉ. शांतिश्री धुलपुडी पंडित यांच्या नियुक्तीची सोमवारी घोषणा करण्यात आली. जेएनयूच्याच माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. पंडित विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू झाल्या आहेत. मात्र या घोषणेनंतर या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. समाजमाध्यमांमध्ये त्यांनी शेतकरी, विद्यार्थी आदी घटकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिपण्या समाजमाध्यमांमध्ये पसरल्या. कुलगुरू निवड प्रक्रियेतील उमेदवारांबाबत त्यांच्या संबंधित विद्यापीठ-संस्थेकडून दक्षता समितीचा अहवाल (व्हिजिलन्स क्लीअरन्स अँड इंटिग्रिटी सर्टिफिकेट) मागवला जातो. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून केंद्र सरकारला डॉ. पंडित यांच्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाची प्रत ‘लोकसत्ता’ने मिळवली आहे.




विद्यापीठाने सरकारला सादर केलेल्या अहवालात गेल्या दहा वर्षांत डॉ. पंडित यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या अहवालानुसार डॉ. पंडित यांच्यावर २०११मध्ये पाच वेतनवाढी रोखण्याची आणि २०१७मध्ये दोन वेतनवाढी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती.
भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) या कोटय़ातील जागांवरील प्रवेशांत डॉ. पंडित यांनी गैरप्रकार केल्याचे विद्यापीठाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने स्पष्टपणे नमूद केले होते. त्यानुसार २०११मध्ये कारवाई करण्यात आली.
व्हिजिलन्स रिपोर्ट स्वच्छ नसताना झालेली निवड अनैतिक
निवड प्रक्रियेतील सहभागी व्यक्तीची आतापर्यंतची कारकीर्द स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठीच व्हिजिलन्स रिपोर्ट सरकारकडून घेतला जातो. व्हिजिलन्स रिपोर्ट स्वच्छ नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे नैतिकदृष्टय़ा योग्य ठरत नाही. मात्र डॉ. पंडित यांचा व्हिजिलन्स रिपोर्ट स्वच्छ नसताना केंद्र सरकारने कोणत्या निकषकांवर निवड केली हा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडीबाबत न्यायालयात आव्हान देता येऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
वरुण गांधी यांच्याकडून केंद्राला घरचा आहेर
कुलगुरुपदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ. पंडित यांनी प्रसिद्धिपत्रक प्रसृत केले. त्यावरून भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी डॉ. पंडित यांच्या निवडीबाबत सरकारला घरचा आहेर दिला. ‘जेएनयूच्या नव्या कुलगुरूंचे प्रसिद्धिपत्रक म्हणजे निरक्षरता आणि व्याकरणाच्या चुकांचे प्रदर्शन आहे. अशा सामान्य नियुक्तीमुळे तरुणांच्या भविष्याचे नुकसान होत आहे,’ अशी थेट टीका गांधी यांनी ट्विटद्वारे केली.