पुणे : गंभीर गुन्ह्यातील सहभाग, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून गुंगारा देणाऱ्या फरार संतोष धुमाळ या गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीला भेटण्यास आल्यानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे. खिडकीतून उडी मारून पळून जाताना त्याला पकडण्यात आले.

संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक सुधीर घुले तसेच पोलीस हवालदार लांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संतोष धुमाळ हा मागील वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. दरम्यान, तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाण येथील गुलमोहर सोसायटीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार लांडगे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी पथकाला आरोपीला पकडण्याबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी गुलमोहर सोसायटी परिसरासह ये-जा करण्याच्या मार्गावर सापळा रचला. सोसायटीमध्ये चौकशी करताना आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर साथीदार विपुल उत्तम माजिरे याच्याबाबतही माहिती दिली. विपुल माजिरे बालगंधर्व रंगमंदिरासमोरील गल्लीमध्ये दुकानाच्या मागे भेटण्यासाठी येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथेही सापळा रचला. काही वेळातच विपुल माजिरे तेथे आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोण आहे संतोष धुमाळ?

संतोष धुमाळ सराईत गुन्हेगार असून, त्याची कोथरूड भागात दहशत देखील आहे. संतोष धुमाळ हा एके काळी नीलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य होता. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. धुमाळ मूळचा मुळशी तालुक्यातील असून, सध्या तो कोथरूड परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, कालांतराने तो घायवळची टोळी सोडून बाहेर पडला. त्यानंतर त्याचे घायवळ टोळीशी वाद सुरू झाले. काही महिन्यांपूर्वी जमिनीच्या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यातून घायवळ टोळीने संतोष धुमाळवर हल्ला करण्याचे नियोजन देखील केले होते.