पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी समाज माध्यम प्रभावक संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी संतोष पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या समाज माध्यमातील खात्यावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत नुकतीच प्रसारित केले. ‘जनतेच्या प्रश्नाची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत,’ असा आशय असलेली चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली.

या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक पांडे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. ‘अश्लील, शिवराळ भाषा चित्रफितीत आहे. या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते,’ असा आरोप करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंडित यांना पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.