पुणे : समाजमाध्यमात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरसेविकेविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी या बाबतचे आदेश दिले.

पंडित यांच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. विनयभंग, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. पंडित यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने पंडित यांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पंडित यांनी त्याच्या वकिलांमार्फत न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

‘आरोपीने वापरलेले शब्द सामान्य वापरातील आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे पंडित यांना कोठडीची गरज नाही’, असे त्याच्या वकिलांनी युक्तिवादात सांगितले. सरकारी वकिलांनी पंडित यांच्या जामिनास विरोध केला. बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाललायने पंडित यांना जामीन मंजूर केला. पंडित यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालयाने सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकला. ‘संबंधित चित्रफीत तपास अधिकाऱ्यांकडे आहे. हे कृत्य हेतूपुरस्सर होते किंवा सामान्य हा मुद्दा खटल्याच्या सुनावणीदरम्यान पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होईल. या गुन्ह्याची कमाल शिक्षा तीन वर्षांपर्यंत आहे. तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. सरकारी वकिलांनी व्यक्त केलेली शक्यता आणि मुद्दे जामीन नाकारण्यास पुरेशा नाहीत’, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने पंडित याला जामीन मंजूर केला.