पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष पंडित याला न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वादग्रस्त चित्रफीत तयार करताना वापरलेला मोबाइल संच आणि ट्रायपाॅड पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी संतोष गजानन पंडित (वय ४८, रा. नारायण पेठ) याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत एका महिलेने फिर्याद दिली. पंडितविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (१) (४), ७५ (३), ३५६ (२), ३५२ सह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडितने महिलांविषयी शेरेबाजी करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली. तसेच, घटनात्मक पदावरील मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्द वापरून त्यांची बदनामी केली.

समाजात अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते. पंडित याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला मंगळवारी (८ सप्टेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले. ‘यापूर्वी पंडितविरुद्ध पर्वती पोलीस ठाणे, डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी महिला साक्षीदारांकडे चौकशी करायची आहे.

आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करुन आरोपपत्र सादर करायचे आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी’, अशी विनंती सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तिवादात केली. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.