पुणे : शहरातील महापालिकेची सर्वांत मोठी बाग अशी ओळख असलेली सारसबाग दोन दिवस बंद राहणार आहे. पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. सध्या शाळांना सुटी असल्याने लहान मुले आणि नागरिकांची बागेत गर्दी होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव (आज) गुरुवारी (२८) आणि उद्या (शुक्रवारी) (२९ मे ) असे दोन दिवस सारसबाग बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, बाग बंद असली, तरी सारसबागेत असलेले तळ्यातील गणपती मंदिर सुरू राहणार आहे. भाविकांना या मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेता येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात सारसबाग आहे. या बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांंची संख्या मोठी आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याची सुटी असल्याने लहान मुलांची बागेमध्ये गर्दी होत आहे. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी पुणे शहरात तीन दिवसांपूर्वी प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव २८ आणि २९ मे हे दोन दिवस सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
हे दोन दिवस कोणालाही सारसबागेत जाता येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे यांनी हे आदेश काढले. पोलीसांचे प्रतिबंधात्मक आदेश हे फक्त सारसबाग उद्यानासाठी आहेत. सारसबागेतील गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नाहीत, त्यामुळे या दोन्ही दिवशी मंदिर भाविकांसाठी सुरू राहणार आहे, असे श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितले.
तळ्यातील गणपतीच्या दर्शनासाठी येणारे भाविक पूर्वेकडील महालक्ष्मी मंदिराच्या समोरील बाजूच्या मुख्य प्रवेशद्वाराने मंदिरात येऊ शकतात. मंदिराची वेळ सकाळी साडेपाच ते रात्री दहा अशी असणार आहे, असेही पंडित यांनी सांगितले.
महापालिकेने सुरुवातीला सारसबाग मंदिर आणि परिसर दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, काही वेळेतच महापालिका प्रशासनाने आपली भूमिका बदलून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
महापौरांची समाजमाध्यमावर पोस्ट अन् चर्चेला उधाण
सारसबाग आणि मंदिर दोन दिवस बंद राहणार असल्याची पोस्ट महापौर मंजूषा नागपुरे यांच्या सोशल मीडिया टीमकडून करण्यात आली. नंतर त्यामध्ये दुरुस्ती करून सारसबाग बंद राहणार असल्याची पोस्ट करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. बकरी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधव सारसबागेत येतात. त्यांना मज्जाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली.
या बाबत महापौर नागपुरे यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या, ‘सोशल मीडिया टीमकडून सारसबाग मंदिर डागडुजीसाठी बंद राहणार असल्याची पोस्ट चुकीने प्रसिद्ध झाली. पोलिसांनी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर म्हणून मी केवळ पुणेकरांना याची माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली असावी. बकरी ईद आणि मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही संबंध नाही.’
