वाहनाच्या पार्किंगवरून झालेल्या किरकोळ वादातून ससून रुग्णालयातील वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना बुधवारी रात्री बेदम मारहाण केली. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी रुग्णालयाकडे तक्रार केल्यानंतरही तातडीने दखल घेण्यात न झाल्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करून विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना घेराव घातला. त्यानंतर वाहनतळाचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयात नर्सिगच्या तिसऱ्या वर्षांत शिकणारे सुमन्य ठोंबरे (वय २०, मूळ रा. बीड), रवींद्र सुरवसे (वय २०, मूळ रा. जामखेड) व सुनील गडाळे (वय २०, मूळ रा. बीड) हे विद्यार्थी या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ठोंबरे याची मावशी ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याने बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याचे काका संजय बिक्कड हे रुग्णालयात आले होते. त्यांनी वाहनतळावर गाडी लावली. त्या वेळी वाहनतळाचे कर्मचारी व त्यांच्यात किरकोळ वाद झाला. याची माहिती ठोंबरे याला मिळाल्यानंतर तो व त्याचे मित्र त्या ठिकाणी पोहोचले.
वाहनतळावरील कर्मचाऱ्यांनी त्या वेळी मद्यपान केले होते. ठोंबरे व त्याचे मित्र वाहनतळावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना लोखंडी रॉडचे बेदम मारहाण केली. रुग्णालयातील या वाहनतळाचे कंत्राट खासगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत या विद्यार्थ्यांनी रुग्णालयाकडे तक्रार दिली, मात्र त्यावर रुग्णालयाकडून काहीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी चंदनवाले यांच्या केबिनमध्ये त्यांना घेराव घातला. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या देत वाहनतळाचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.