पुणे : पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांचा वैद्यकीय भार असणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटांच्या तुटवड्यावर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, अतिदक्षता विभागाच्या खाटांची संख्या ३४ ने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यातील २० नवीन खाटांना मंजुरी मिळाली आहे.
ससून रुग्णालयावर सध्या अतिदक्षता विभागात भरती करावी लागू शकेल, अशा गंभीर रुग्णांचा मोठा ताण येत आहे. सध्या रुग्णालयातील वेगवेगळ्या ९ विभागांत एकूण १६२ खाटा अतिदक्षता विभागासाठी उपलब्ध आहेत. मात्र, ऐन वेळी एखाद्याला खाट मिळाली नाही, तर जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशाच एका घटनेनंतर अतिदक्षता विभागात खाट न मिळाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने अतिदक्षता विभागाचा विस्तार वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या प्रस्तावानुसार, वैद्यकीय अतिदक्षता विभागाचा विस्तार करून त्यात नवीन १४ खाटा वाढवण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात १० अतिरिक्त खाटा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी १० अतिरिक्त खाटांच्या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांतील खाटांची संख्या प्रत्येकी १० वरून २० वर पोहोचली आहे. उर्वरित १४ खाटांची मंजुरी मिळताच ससूनमधील एकूण अतिदक्षता विभागातील खाटांची क्षमता १६२ वरून १९६ वर जाईल.
रुग्णालयातील अपघात व आपत्कालीन उपचार विभागाची क्षमता सुधारण्यावरही भर दिला जात आहे. सध्या या विभागात ३० खाटा उपलब्ध असून, त्यात आणखी २० खाटांची भर घालून, ही क्षमता ५० खाटांपर्यंत नेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
याविषयी माहिती देताना , ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, ससूनमधील अतिदक्षता विभागात सध्या १६२ खाटा आहेत. रुग्णांची गरज ओळखून अतिरिक्त ३४ खाटांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यापैकी २० खाटांना हिरवा कंदील मिळाला आहे. उर्वरित १४ खाटांना मंजुरी मिळताच जास्तीत जास्त गरजू रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार देणे शक्य होईल
उपअधिष्ठाता आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, अतिदक्षता विभागात खटांची संख्या वाढणे ही चांगली बाब असून, यामुळे अधिकाधिक गंभीर रुग्णांना सेवा देता येणार आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या अनुभवाचा फायदा होणार आहे.
