पुणे : छातीत तीव्र वेदना, अंगाला फुटलेला घाम आणि त्यानंतर अचानक बेशुद्ध पडलेला रुग्ण… हृदयाचे ठोके अनियमित होऊन रक्ताभिसरण थांबण्याची गंभीर स्थिती निर्माण झाल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘कोड ब्लू’ पथक आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करून सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या रुग्णाचे हृदय पुन्हा सुरू केले. पुढील उपचारांनंतर दोन दिवसांनी रुग्ण शुद्धीवर आला. त्यानंतर त्याच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करून त्याला घरी सोडण्यात आले.
ससून रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत आपत्कालीन विभाग, वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया विभागांतून ‘कोड ब्लू’ पथकाला सुमारे ४,०८१ वेळा पाचारण करण्यात आले. यापैकी २,०६७ अतिगंभीर रुग्णांमध्ये उपचारांपूर्वीच श्वासोच्छ्वास आणि रक्ताभिसरण तात्पुरते पूर्ववत करण्यात पथकाला यश आले. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि समन्वयित उपचार यांचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले.
ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात ही घटना नुकतीच घडली. रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे दिसत होती. उपचारांसाठी खाटेवर बसविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तो अचानक कोसळला. त्याला ‘व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन’ हा हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित जीवघेणा विकार झाला होता. या स्थितीत हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता प्रभावीपणे काम करीत नाही. त्यामुळे तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयात ‘कोड ब्लू’ घोषित करण्यात आला. त्यानंतर हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण पूर्ववत करण्यासाठी हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन प्रक्रिया (सीपीआर), डिफिब्रिलेटरच्या साह्याने विद्युत धक्के आणि आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले. मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टर डॉ. शशांक कुटे, डॉ. सिद्धांत, आपत्कालीन वैद्यकशास्त्र विभागातील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. धिरेशकुमार आणि डॉ. अभिषेक तसेच कोड ब्लू पथकाचे समन्वयक गौरव महापुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारांसाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
या उपचार प्रक्रियेत मेडिसिन विभागप्रमुख डॉ. एच. बी. प्रसाद, आपत्कालीन वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश्वरी व्होरा आणि भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेखा शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांचेही सहकार्य मिळाल्याचे ‘कोड ब्लू’चे प्रमुख समन्वयक डॉ. धनंजय ओगले यांनी सांगितले
