पुणे : ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीची लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ वैद्यकीय कौशल्याच्या मदतीने महिलेवर ‘डायफ्रॅमॅटिक हर्निया’ची शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी उपचारांमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले.

गेल्या १५ दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब कमी-जास्त होणे अशा तक्रारींमुळे एका ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेला गेल्या आठवड्यात ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी शिर्डी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले होते. तिथे त्यांना ‘डायफ्रामॅटिक हर्निया’ (छाती आणि पोटाच्या दरम्यान असणाऱ्या पडद्याला छिद्र पडणे) असल्याचे निदान झाले होते.

ससून रुग्णालयात आल्यानंतर रुग्णाची ‘एचआरसीटी’ चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांना अत्यंत दुर्मीळ प्रकारचा ‘रेट्रोस्टर्नल लॅरी’ आणि ‘मोर्गाग्नी डायफ्रॅमॅटिक हर्निया’ असल्याचे निष्पन्न झाले. या हर्नियामुळे रुग्णाच्या पोटातील चरबी आणि जठराचा भाग छातीत सरकला होता. परिणामी, हृदयाच्या मागच्या भागावर आणि डाव्या फुफ्फुसावर प्रचंड दाब येऊन डावे फुफ्फुस निकामी झाले होते. फुफ्फुसात थोडे पाणीही जमा झाले होते.

रुग्णाची हृदयविकाराची स्थिती नियंत्रणात आणल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्यावर तातडीने लॅप्रोस्कोपिक अर्थात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी हृदयाच्या मागच्या बाजूला अडकलेली पोटातील चरबी आणि जठर अत्यंत काळजीपूर्वक पूर्ववत केले. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २४ तासांत महिलेचा श्वास घेण्याचा त्रास पूर्णपणे थांबला आणि त्यांचा रक्तदाबही सामान्य झाला आहे.

ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव, डॉ. भूषण तेलंग, डॉ. अलिषा माथूर, डॉ. प्रज्ज्वल शेट्टी, डॉ. रिझ्मा माहेश्वरी, तसेच बोधिवैद्यक विभाग आणि परिचारिका कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वी केली.

दोन्ही प्रकारचे हर्निया एकत्र असण्याचे प्रमाण ३ ते ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या रुग्णाच्या बाबतीत, हृदयाच्या भागावर कोणतेही आवरण नव्हते आणि खाली ‘ऑर्टा’ ही मोठी रक्तवाहिनी होती. त्यामुळे तिथे जाळी वापरणे शक्य नव्हते. अशा वेळी पोटाच्या भिंतीतून मॅट्रेस सुचर्स टाकून जाळी न वापरता केलेली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही अत्यंत जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धत ठरते. – डॉ. किरणकुमार जाधव, सर्जिकल प्रमुख

डायफ्रॅमॅटिक हर्नियामुळे रुग्णाला अचानक तीव्र श्वास कोंडणे किंवा पोटात पीळ पडणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. – डॉ. अनंत बीडकर, विभाग प्रमुख

प्रौढ व्यक्तींमध्ये कोणत्याही अपघाताशिवाय ‘मोर्गाग्नी हर्निया’ आढळणे अत्यंत दुर्मीळ आहे. ससून रुग्णालयात रोबोटिक आणि अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांवर आधुनिक तंत्रज्ञानाने, कमीत कमी टाक्यांमध्ये व कमी कालावधीत यशस्वी उपचार करणे शक्य होत आहे. – प्रा. डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय