पुणे : ससून रुग्णालायचा विस्तार करून मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी १५ एकर जागा द्यावी, असा प्रस्ताव रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार जागेची चाचपणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भूमी आणि अभिलेख विभागाला दिली आहे. त्यानुसार येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या १३८ एकर जागेपैकी १५ एकर जागा ससून रुग्णालयाच्या विस्तारासाठी देण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने नवे सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे जागा मागणीचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली.
ससून रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, येरवड्यातील मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार आणि महसूल तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ससून रुग्णालयास मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे एक हजार खाटांचे हे रुग्णालय असेल. त्या रुग्णालयात कर्करोगाचे स्वतंत्र रुग्णालय असून, रुग्णालयासाठी सुमारे १५ एकर जागेचा शोध घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख आणि महसूल विभागाला आदेश दिला आहे.
येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या मालकीची सुमारे १३८ एकर जागा उपलब्ध आहे. त्या जागेपैकी मनोरुग्णालय, वसतिगृह वगळता उर्वरित मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाची सरकारी गायरान जागा तशीच पडून आहे. तसेच, या जागेवर स्थानिकांकडून अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. या जागेची मोजणी करून १३८ एकर जागा ताब्यात आहे, का याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर किती जागेवर अतिक्रमण आहे ते तपासले जाईल. त्यानुसार उर्वरित जागेपैकी १५ एकर जागा ससून रुग्णालयास मल्टिस्पेशालिटी रुग्णालयास उपलब्ध करण्याचा जिल्हा प्रशासनाने विचार सुरू केला आहे.
या संदर्भात भूमी अभिलेख विभागाला या जागेची मोजणी करून त्याचा अहवाल येत्या २० दिवसांत देण्याचे महसूल प्रशासनाने सूचना केली आहे. मनोरुग्णालयाची ही जागा आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रानंतर जागा ताब्यात मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ससून रुग्णालयाने मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी १५ एकर जागेची मागणी प्रशानसाकडे केली आहे. त्यानुसार जागा शोधण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
