पुणे : ‘ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात खाटांच्या उपलब्धतेविषयी ९२२५३३०५३५ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून, रुग्णाला ‘ससून’मध्ये आणण्यापूर्वी नातेवाईकांनी या क्रमांकावर संपर्क साधून खाटांच्या उपलब्धतेची माहिती घ्यावी व नोंद करावी,’ असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी नुकतेच पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख टर्शरी केअर सेंटर असलेल्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागातील खाटा पुरेशा उपलब्ध नाहीत. दररोज ५ ते ६ गंभीर रुग्ण अतिदक्षता विभागात खाटासाठी प्रतीक्षेत असतात. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वेळेवर उपचार मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने ९२२५३३०५३५ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

ससून रुग्णालयात दररोज सरासरी १,६२९ बाह्यरुग्ण आणि १,०३६ आंतररुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर गंभीर रुग्ण येथे उपचारांसाठी येतात. खासगी रुग्णालयांचे वाढते खर्च आणि विमा मर्यादांमुळे आता मध्यमवर्गीय रुग्णांचा ओघही ससूनकडे वाढला आहे, असे ससून प्रशासनाने सांगितले.

‘रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा कायम भरलेल्या असतात. एखादा रुग्ण बरा होऊन डिस्चार्ज मिळाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतरच दुसरी खाट उपलब्ध होते. पुणे परिसरातील इतर रुग्णालये बऱ्याचदा शेवटच्या क्षणी गंभीर रुग्णांना ससूनमध्ये जाण्यास सांगतात. अशा वेळी अचानक आलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात खाट न मिळाल्यास उपचारांत अडचणी निर्माण होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते,’ असे डॉ यल्लप्पा जाधव यांनी दिली.

अतिरिक्त ६० खाटांचा प्रस्ताव

अतिदक्षता विभागात खाटांचा तुटवडा लक्षात घेता वैद्यकीय अतिदक्षता विभागासाठी ४० आणि सर्जिकल अतिदक्षता विभागासाठी २० अशा एकूण ६० अतिरिक्त अतिदक्षता विभागात खाटांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाला सादर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर व परिचारिकांचे अतिरिक्त मनुष्यबळ मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.