जेजुरी : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा जगताप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे महायुतीतील या दोन मित्रपक्षांमध्ये चुरस असणार आहेया नगरपरिषदेच्या २०१६ च्या निवडणुकीत काँग्रेसने आनंदी जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनमत विकास आघाडीच्या नावाने निवडणूक लढवली होती. १९ पैकी १५ नगरसेवक आघाडीचे निवडून आले. शिवसेना आणि अन्य पक्षांचे ४ जण निवडून आले होते. त्यामुळे सासवड नगरपरिषदेमध्ये माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. काँग्रेसचे मार्तंड लक्ष्मण भोंडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले होते.

काँग्रेसचे दिवंगत आमदार चंदूकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २० वर्षापासून काँग्रेसची नगरपरिषदेवर सत्ता होती. त्यानंतर माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. जगताप यांनी सासवड येथे शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.

जगताप यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी मंत्री, विद्यमान आमदार विजय शिवतारे हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांचीही ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचे घोषित केले आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांनी उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे युवा नेते साकेत जगताप, अजित जगताप, तर शिवसेनेतर्फे डॉ. राजेश दळवी, सचिन भोंगळे यांची नावे चर्चेत आहेत.नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ होत आहे.दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रभाग संख्या ११ झाली असून, २२ नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्यावयाचे आहेत. सासवडची मतदार संख्या २५६०० एवढी आहे.

संजय जगताप यांची ताकद पणाला

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले संजय जगताप यांच्या ताब्यात सासवड नगरपरिषद आणि जेजुरी या दोन्ही नगरपरिषदा होत्या. या ठिकाणी भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. सासवडमध्ये आमदार विजय शिवतारे यांनीही ताकतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. सासवड हे तालुक्याचे ठिकाण आहे. नियोजित विमानतळ येथून जवळच असल्याने येथील नगरपरिषद ताब्यात ठेवण्यासाठी महायुतीतील हे दोन्ही नेते प्रयत्न करणार आहेत.