एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पुणे पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ॲड. सदावर्ते यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याआधी ॲड. सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सातारा पोलिसांनी एका प्रकरणात ॲड. सदावर्ते यांना अटक केली आहे. सातारा न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे साताऱ्यातील प्रकरण?

खासदार उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाबद्दल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांना आज सातारा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षाने विविध मुद्दय़ांचा तपास करायचा असल्याचे सांगत न्यायालयाकडे १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान, या वेळी सरकारी पक्षाचा युक्तिवाद खोडून काढत बचाव पक्षाच्या वतीने पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

पुण्यात दीड वर्षांपूर्वी गुन्हा दाखल

एक सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अमर रामचंद्र पवार (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात ॲड. सदावर्तेंना अटक होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल पुणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठविला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी

ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले आहे.