पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील प्रतिभावान ७५ युवकांचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला. ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियनच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रविण निकम यांच्यासह महाराष्ट्रातील चार तरुणांचा समावेश आहे. काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त लंडन येथे हा सन्मान करण्यात आला. प्रवीण निकम, चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव अशी या चार तरुणांची नावे आहेत.
हेही वाचा >> आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”
पुरस्कारासाठी ७५ युवकांची निवड
शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी संधीचे मार्गदर्शन, ५३ देशांच्या समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम आदींची दखल ब्रिटिश काऊंसील व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस.वाय. कुरेशी, ब्रिटिश काऊंसील शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या भारतातील ७५ युवकांची निवड पुरस्कारासाठी केली आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला यांचाही समावेश
या सर्व ७५ युवकांना लंडन येथे सन्मानित करण्यात आले. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ७५ वर्षांत ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचा वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.