पुणे : राज्याच्या महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उताऱ्यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक आठ-अ) मिळकतपत्रिका डाउनलोड करण्यावर नागरिकांकडून भर देण्यात आला आहे. या सुविधेचा वापर करून १८ एप्रिलला एका दिवसात ८७ हजार नागरिकांनी एक लाख दोन हजार उतारे आणि मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड केल्या. राज्यातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि आठ-अ उतारे नागरिकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. मिळकतपत्रिकादेखील आता मिळू लागली आहे. सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी विक्री यासाठी सातबारा उताऱ्यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत. त्यानुसार एका दिवसात एक लाख दोन हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारे; तसेच मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७६ हजार ६९ साताबारा उतारे आहेत. आठ-अ उतारे १८ हजार ५२६ आणि मिळकतपत्रिका ५६१७ आहेत. एकाच दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध उतारे डाउनलोड केल्याने शासनाला २० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.
कुठे मिळतात?
जमाबंदी आयुक्तालयाने https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावरून ऑनलाइन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ-अ उतारे आणि मिळकतपत्रिका डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी कामकाजासाठी हे उतारे ग्राह्य धरले जातात. https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर विनाशुल्क डिजिटल स्वाक्षरी नसलेले; पण माहितीसाठीचे उतारे उपलब्ध आहेत.
आतापर्यंतचे विक्रम…
१४ फेब्रुवारी २०२२ – एक लाख
१६ जून २०२१ – ६२ हजार
७ एप्रिल २०२१ – ३८ हजार
१६ मार्च २०२१ – ४० हजार २००
२२ फेब्रुवारी २०२१ – ४६ हजार
