पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थांतील प्राध्यापक, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधनिबंध प्रसिद्ध करताना विद्यापीठाचा संबंधित विभाग, महाविद्यालय, परिसंस्थेचे नाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संशोधनपत्रिकेत संबंधित नावे नसल्यास शोधनिबंधाला मान्यता देणार येणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थांतील प्राध्यापक, पीएच.डी.चे विद्यार्थी विविध विषयांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करतात. तसेच, कुलगुरूंच्या आदेशानुसार पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पीएचडी गोषवारा अथवा प्रबंध जमा करताना ‘रेफरीड जर्नल’मध्ये कमीत कमी एक लेख प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. त्यास अनुसरून संशोधक विद्यार्थी आणि संबंधित संशोधन मार्गदर्शक संयुक्तरीत्या संशोधनपर लेख प्रसिद्ध करीत असतात. मात्र, हे लेख प्रसिद्ध करताना काही प्राध्यापक, पीएचडी विद्यार्थी विद्यापीठाच्या नावाचा उल्लेखच करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढे आता संशोधनपर लेख प्रसिद्ध करताना विद्यापीठाचा संबंधित विभाग, महाविद्यालय, परिसंस्थेचे नाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.