पुणे : राज्यातील आघाडीचे विद्यापीठ असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रमांतील विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थांचा ओढा दिसून येत आहे. मात्र, यंदा विद्यापीठातील सुमारे ११ टक्के जागा रिक्त राहिल्या असून, बदलत्या काळाचा विचार करून विद्यापीठाने अभ्यासक्रमांबाबत नवा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी विविध विभागांमध्ये ९० पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. प्रवेशासाठी उपलब्ध ३,३१६ जागांपैकी २,९२९ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यामुळे सुमारे ३८७ जागा रिक्त राहिल्या. विद्यापीठाच्याच आकडेवारीचा आढावा घेतल्यास पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांना अधिक प्रतिसाद मिळाला.
विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित संगणकशास्त्र, विदा विज्ञान, वनस्पतिशास्त्र, व्यवस्थापन, पर्यावरणशास्त्र, आरोग्यशास्त्र, जैवतंत्रज्ञान अशा काही विभागांतील अभ्यासक्रमांच्या बहुतांश जागा भरल्याचे दिसून येते. तसेच, विज्ञान-तंत्रज्ञानातील काही अभ्यासक्रमांनाही अत्यल्प प्रवेश झाले आहेत. शिवाय परकीय भाषा, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, ललित कला अशा काही विभागांत कमी प्रवेश झाल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाअभावी काही विभागांतील प्रवेशांसाठी थेट प्रवेश (स्पॉट ॲडमिशन) फेरी राबवावी लागली. आजवर विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मोठी चुरस असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खासगी विद्यापीठांची स्पर्धा वाढत असताना, तसेच त्या विद्यापीठांकडून नवनवे अभ्यासक्रम उपलब्ध केले जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जागा रिक्त राहत असल्याचे चित्र आहे.
‘पूर्वीच्या तुलनेत पदव्युत्तर शिक्षणाकडे असलेला ओढा आता कमी होताना दिसत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांतील संधींसाठी किंवा अगदी विशिष्ट स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतात. बदलत्या काळानुसार आता विद्यापीठाने नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. विद्यापीठातील विद्यार्थिसंख्या वाढण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच पदवीस्तरावर नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करायची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.
विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांना उत्तम प्रतिसाद आहे. मात्र, काही विभागांतील पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये काळानुरूप बदल करावा लागणार आहे. तसेच, अभ्यासक्रमांना कौशल्यांची जोड द्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने काम करण्यात येत आहे. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
