पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या विषयांवर विद्यापीठात आंदोलन करण्यात मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मांडलेल्या ठरावाला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभेच्या घटनात्मक अधिकारांचा विचार करून या निर्णयाबाबत पुनर्विचाराची मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठात सातत्याने विविध विषयांवर आंदोलने होत असतात. मात्र, गेल्या काही काळात विद्यापीठात कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्या दिवशी विद्यापीठात भाजपप्रणित वंदे मातरम कृती समितीतर्फे यूथ की आवाज कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन असे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांचा थेट विद्यापीठाशी संबंध नव्हता.
या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या ऑगस्टमध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी विद्यापीठाशी निगडित नसलेल्या राष्ट्रीय पातळीवरीचे प्रश्न किंवा व्यापक स्वरुपाच्या विषयांसंदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने, आंदोलने, सभा, मोर्चाचे आयोजन विद्यापीठाच्या आवारात करण्यास परवानगी न देण्याबाबतचा ठराव मांडला. विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या विषयांवरील निदर्शने, सभा, आंदोलनांसाठी विद्यापीठाच्या आवाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत, अनेक प्रसंगी पोलिस प्रशासनाने अशी निदर्शने, आंदोलने, सभा, मोर्चांना विद्यापीठ आवारात परवानगी दिल्याचे निदर्शनास आले आहे.
या आंदोलनात, निदर्शनांमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होणारे निदर्शक, विद्यापीठ आवारात अनुचित घटना घडण्याची शक्यता, विद्यापीठाच्या शांततामय, शैक्षणिक वातावरणात निर्माण होणारा अडथळा, मालमत्तेचे होणारे नुकसान, व्यवस्थेवरील अकारण ताण, शिकणारे विद्यार्थी, शिक्षक यांना शैक्षणिक प्रक्रियेत निर्माण होणारी बाधा विचारात घेऊन अशा प्रकारची निदर्शने, आंदोलने, सभा, मोर्चा यांना विद्यापीठ आवारात परवानगी न देण्याबाबत प्रस्तावात नमूद करण्यात आले. या प्रस्तावाला डॉ. देविदास वायदंडे अनुमोदन दिले. मंठाळकर म्हणाल्या, आंदोलनांचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे आंदोलने थांबवण्याचा अजिबातच उद्देश नाही. तर विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या विषयांवर विद्यापीठात आंदोलने होणे योग्य नाही. त्यातून शैक्षणिक कामकाज विस्कळीत होते. या निर्णयानंतर अनेक आंदोलने विद्यापीठात झाली आहेत.
दरम्यान, एका बाजूला विद्यार्थी निवडणुकांसाठी समिती गठीत केली जाते, दुसरीकडे विद्यापीठ परिसरात मोर्चे, आंदोलने, निदर्शनांवर निर्बंध घातले जातात. तसेच विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या मुद्द्यांवर आंदोलन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभेच्या घटनात्मक अधिकारांच्या संदर्भात पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असे विद्यापीठ विद्यार्थी कृती संघर्ष समिती अध्यक्ष अभिषेक शेलकर यांनी सांगितले.
