पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ये-जा करण्यासह मुख्य इमारत परिसरात वावरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी विशिष्ट विषयांवरच आंदोलने करावीत, असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केले. त्याविरोधात आता विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून, आज (२ नोव्हेंबर) सायंकाळी चार वाजता मुख्य इमारत परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने केलेल्या ठरावानुसार, विद्यापीठात कोणत्या विषयावर आंदोलने, सभा, मोर्चे काढावेत, याबाबतचे निर्देश देणारे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले. विद्यार्थी संघटनांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला असून, हे पत्रक तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, संमत विद्यार्थी आंदोलन, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सत्यशोधक विद्यार्थी आघाडी आणि पीएचडी रिसर्च स्कॉलर असोसिएशन या संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत.
विद्यापीठातील प्रवेशाच्या वेळा
आयुका प्रवेशद्वारातून सकाळी साडेनऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत प्रवेश करता येणार आहे. हे प्रवेशद्वार विद्यापीठाच्या सेवेत असणारे अधिकारी, अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिलेल्या वेळेत खुले ठेवण्यात येईल. विद्यापीठाचे ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येईल. विनापरवानगी प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विद्यापीठ आवारात फलकांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्य इमारत परिसरात वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने काढलेले परिपत्रक विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती आणि संचार स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या तुघलकी निर्णयाविरोधात मुख्य इमारत परिसरात आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांसह विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. – डॉ. राहुल ससाणे, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे परिपत्रक काढले आहे. त्याने आंदोलन आणि मोर्चांच्या संविधानिक अधिकारांवर निर्बंध आले आहेत. अनावश्यक सुरक्षा व्यवस्था आणि बॅरिकेडिंगमुळे विद्यापीठ आवाराला छावणीचे स्वरूप आले आहे. आता विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करणार आहोत. – अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभाग
विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या विषयांवर विद्यापीठाबाहेरील घटकांची, संघटनांची आंदोलने, निदर्शने मोठ्या प्रमाणावर विद्यापीठ आवारात होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेने अशा आंदोलनांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यापीठ प्रश्नांवर संवैधानिक पद्धतीने आपला निषेध नोंदवू शकतात, त्यास प्रतिबंध नाही. – प्रफुल्ल पवार, कुलसचविव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
