पुणे : सिकल सेल अॅनिमियावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. पूजा दोशी आणि त्यांच्या संशोधक चमूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘सिकल आधार ॲप’ ही एकात्मिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून, ही प्रणाली सिकल सेल रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. आनुवंशिक असलेल्या सिकल सेल आजारात लाल रक्तपेशी विळ्यासारख्या होऊन शरीरातील अवयवांकडे जाणारा रक्तप्रवाह विस्कळीत होतो. त्यामुळे दीर्घकालीन वेदना, पक्षाघात, फुफ्फुस व मूत्रपिंड विकार, संसर्गजन्य आजार आणि मानसिक ताण अशा गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात.

सिकल सेल आजारावर संशोधन करणाऱ्या डॉ. पूजा दोशी यांच्या संशोधन गटाने या पूर्वी ‘हिमाधार’ ही सिकल सेल संकट व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणारी हर्बल औषधी संरचना विकसित केली करून त्याचे एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त केले आहेत. नव्या संशोधनात त्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘सिकल आधार ॲप’ संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या ॲपद्वारे रुग्ण, डॉक्टर, काळजीवाहक, स्वयंसेवी संस्था, रक्तपेढ्या आणि शासकीय योजनांना एका डिजिटल परिसंस्थेमध्ये एकत्र आणणे शक्य होणार आहे.

Award Banner

ॲपच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषध व उपचार मार्गदर्शन, सिकल सेल तपासणी व जनजागृती मोहिमा, सिकल सेल योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथा, आहार, पोषण, योग व ध्यान मार्गदर्शन, मानसिक ताण व आघात व्यवस्थापनासाठी प्रादेशिक भाषांमध्ये मार्गदर्शन, विवाह समुपदेशन, स्वयंसेवी संस्थांशी संपर्क, यूडीआयडी कार्ड, मोफत रक्त संक्रमण, विमा, प्रवास सवलती व शैक्षणिक सहाय्य यांसारख्या शासकीय योजनांची माहिती देता येणार आहे. या ॲपद्वारे संकलित होणारी माहिती सिकल सेल आजाराच्या उपाययोजनांसाठी अधिक प्रभावी धोरणे आखणे, अंमलबजावणीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

गुणवत्तापूर्ण संकल्पना म्हणून दखल

‘सिकल आधार ॲप’ची संकल्पना विकसित भारत कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या ‘डिझाइन फॉर भारत २०२६’ या राष्ट्रीय युवा नवोपक्रम स्पर्धेत सादर करण्यात आली होती. आयआयटी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात संशोधक विद्यार्थी ऋतुराज गाढवे, एमएस्सी जैवरसायनशास्त्राच्या विद्यार्थिनी कांचन देवघरे व अष्टगंधा वर्तक यांनी ही संकल्पना मांडली. गुणवत्तापूर्ण संकल्पना म्हणून या संकल्पनेची दखल घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.